कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपूर्वी कामावर रुजू व्हा – अनिल परब

एसटी कर्मचार्‍यांना परिवहन मंत्र्यांचे कळकळीचे आवाहन
। मुंबई । दिलीप जाधव ।
एस टी कामगारांवरील निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती या सारख्या कारवाया सरकारने मागे घेतल्या आहेत. 7 व्या वेतन आयोगाच्या जवळपास कामगारांच्या पगाराची वाढ करण्यात आली आहे. महिन्याचा पगार 10 तारखेच्या आता देण्याची हमी तसेच इतर प्रश्‍नाबाबत चर्चा करून सकारात्मकरित्या सोडविण्यात येतील. तेव्हा येत्या 31 मार्च 2022 पूर्वी एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हा असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांनी विधिमंडळात केले आहे.

गेल्या 3 महिन्यांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे. कृती संघटनेने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. संपकरी कामगारांना कामावर रुजू होण्यास कोणी ही बंदी घातलेली नाही. या संपामुळे ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवासी यांच्या बरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. तेव्हा एसटी कामगारांनी या सर्व गोष्टींचा विचार करून कुठल्या ही अपप्रचाराला बळी पडू नका, आपल्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका असेही अनिल परब यांनी सभागृहात सांगितले.

एसटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात राज्यसरकारने वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कामगारांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. एसटी कामगारांना राज्यशासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणे महागाई भत्ता आणि घरभाडे यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मूळ वेतनातही भरघोस वाढ केली आहे असेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

या संप काळात एसटी महामंडळाला कोणतेही उत्पनाचे साधन नसतानाही कामगारांना 2500ते 5000 रुपये दिवाळी भेट म्हणून दिले . या सर्व बाबींचा राज्य शासनावर जवळपास 4हजार 320 कोटी पेक्षा अधिक भार पडणार आहे . तसेच आत्महत्या केलेल्या कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्याचा निर्णय ही महामंडळाने घेतला असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात स्पष्ट केले .

Exit mobile version