| खांब | वार्ताहर |
पावसाळ्यात जंगल भागात तयार होणाऱ्या रानभाज्या आदिवासी बांधवांना आर्थिक बळ देत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू होताच दरवर्षी जंगलभागात नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर रानभाज्या उगवल्या जातात. या रानभाज्या शोधून त्यांची खुडणी करून आदिवासी समाजबांधव ठिकठिकाणी बाजारपेठेत बसून त्यांची विक्री करून दैनंदिन रोजीरोटी सोडवितात.
साधारणपणे दरवर्षी पाऊस सुरू होताच या रानभाज्या जंगलभागात तयार होण्यास सुरुवात होते. यामध्ये सर्वसाधारणपणे टाकळा, भारंगा, कुड्याच्या शेंगा, अळूची पाने, भोवऱ्याची पाने, कुर्डू, तेरा, टेंभरे, मोह फुले व फळे, तेलपट, कोलू, लोत, भोकर, मोखा, भारंगा, काठेमाठ, कुसरा, कुळू आदींसह अन्य विविध रानभाज्यांचा समावेश असतो.
रानभाज्या या पचण्यास हलक्या व विविध प्रकारच्या शारीरिक व्याधींवर रामबाण ठरत असल्याने या भाज्या ग्राहकांच्या देखील पसंतीस उतरत आहेत. या दिवसात या भाज्यांना फारच मोठी मागणी दिसून येते. या रानभाज्या विक्रीतून एका कुटुंबाची सहजरित्या रोजीरोटी सुटत असल्याचे विक्री करणाऱ्या आदिवासी समाजाकडून सांगण्यात आले आहे. तर, जंगलभागात लागणारे वणवे व सततची होणारी जंगलतोड यामुळे रानभाज्या शोधण्यासाठी जंगलभागात खूप फिरावे लागत असल्याचेही त्यांना सांगितले.







