पावसाळी पुट्ठे विक्रीतून रोजगार

। पनवेल । वार्ताहर ।

पावसाळ्यात दुचाकी चालवताना चिखल उडून कपडे खराब होऊ नये या करता अनेक दुचाकी चालक समोरच्या चाकाजवळ प्लास्टिकचे मडगार्ड बसवून घ्यायला पसंती देतात. दुचाकी चालकांची ही गरज ओळखून महामार्गांवर अनेक छोटे विक्रेते सध्या प्लास्टिकचे पुठ्ठे विकण्याचे काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऋतुत होणार्‍या बदलानुसार वापरात येणार्‍या वस्तू खरेदीला ग्राहक नेहमीच पसंती देत असतात. ग्राहकांची ही गरज ओळखून अनेक विक्रेतेदेखील ऋतुनुसार दुकाने थाटत असतात.

मागील काही वर्षात त्यात आणखी एका विक्रेत्याची भर पडल्याचे पाहायला मिळत असून पावसाळ्यात रस्त्यावरून उडणार्‍या चिखलापासून दुचाकीस्वाराच्या कपड्यांचा बचाव व्हावा या करिता लागणारे विविध रंगातील प्लास्टिकचे पुठ्ठे विकणारे विक्रेते परिसरातील महामार्गांवर मोठ्या संख्येने दिसतात.

या पुठ्ठे विक्रीतून दररोज चांगली कमाईदेखील हे विक्रेते करत आहेत. पावसाळा सुरु होताच पाणी आणी चिखल यापासून बचाव करण्याकरता छत्री, रेनकोट, गमबुट, टोप्या यासारख्या अनेक गरजेच्या विविध वस्तु बाजारपेठेत दाखल होत असतात. त्यामध्ये गेल्या काही वर्षापासून महामार्गावर दुचाकी चालवताना उडणार्‍या पाण्यापासून व चिखलापासून संरक्षण व्हावे या हेतूने विकल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या पुठ्ठ्यांचीही भर पडली आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला महामार्गावर विविध रंगाचे पुठ्ठे विकणारे विक्रेते दिसायला सरूवात होते.

दुचाकी चालवताना मार्गावरील उडणारे पाणी आणी चिखल उडु नये, याकरीता अनेक दुचाकीस्वार आपल्या दुचाकीला हे पुठ्ठे लावताना दिसून येतात. मुंबईच्या मस्जीदबंदर येथील बाजारातून विकत आणलेले पुुठ्ठे सायन-पनवेल महामार्गावर विकताना राजस्थान, गुजरात येथून आलेले अनेक युवक सध्या दिसत असून, मागील वर्षी 30 ते 40 रुपयांना विकले जाणारे पुठ्ठे यंदा मात्र 50 ते 60 रुपयांना विकले जात आहेत.

Exit mobile version