रानमेव्यातून स्थानिकांना रोजगार

| माणगाव | वार्ताहर ।
उन्हाळा म्हणजे रान फळांची मेजवानी घेऊन येणारा ऋतू असतो. इतर कोणत्याच ऋतूत न मिळणारी फळे, फुले खास या ऋतूत मिळतात. यामध्ये जांभळे, करवंदे, आठुरणी कोकम इत्यादी फळांचा समावेश असतो. उन्हाळी दिवसात तयार होणारी ही फळे म्हणजे खवय्यांसाठी सुखद असा गोडवा असतो. या फळांच्या विक्रीतून स्थानिकांना हक्काचा रोजगार मिळत आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर आंबा, काजू इत्यादी फळांवरोबर सर्वसामान्यांच्या आवडीची असलेली खास अशा गोडव्याची फळे म्हणजे जांभळे आणि करवंदे होत. रानाची मैना म्हणून करवंदांच्या उल्लेख केला जातो. कोकणातील डोंगर रांगात दिसणार्‍या लहान-मोठ्या विस्तीर्ण अशा करवंदाच्या जाळी म्हणजेच विविध पशुपक्ष्यांसाठी निवारा तर असतोच त्याबरोबरीने उन्हाळी दिवसात हिरव्या पानातून डोकावणारी काळाकभिन्न करवंदांची फळे सर्वांनाच आवडतात. पूर्ण पक्व झालेली ही फळे वरून काळकभिन्न असतात व आतून लालसर रंगांचा गर व काही बिया असतात.आंबट-गोड चवीला लागणारी ही करवंदांची फळे म्हणजे खास उन्हाळ्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध आहेत.

उन्हाळी दिवसात तयार होणार्‍या या जांभळांना चांगली मागणी असून 200 रुपये किलोप्रमाणे ती विकली जातात. करवंदे 10 ते 20 रूपये वाटा विकला जातो. पळसाच्या पानात करवंदाची विक्री केली जाते.रान मेव्यानी भरलेला करवंदाचा द्रोण दिसायला सुंदर व आकर्षक असतो.कोकम 50 ते 60 रुपये किलोने विकला जातो. इतर फळेही रानावनात झाडी झुडपात मिळतात.उन्हाळ्यातील रान मेव्याचा हा गोडवा खवय्यांच्या पसंतीचा असून याची चव वर्षभर मनात रेंगाळत राहते. उन्हाळा ऋतू संपत असताना पुढील काही दिवसांत रानमेव्याचा आनंद भरभरून घेतला जाईल. रान फळांचा हा हंगाम खास वटपौर्णिमेपर्यंत सुरू राहतो.

Exit mobile version