। रायगड । प्रतिनिधी ।
एम्पॉहर इंडिया आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने पी. एन. पी. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये किशोरवयीन मुला-मुलींकरीता एम्पॉहर इंडिया संस्थेच्या वतीने सेतू कार्यक्रमाची अंमलबजावणी, व उद्देश समजून घेणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतु होता.
या कार्यशाळेत अलिबाग तालुक्यातील 14 शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला आहे असे सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख उपस्थित होते. सेतू कार्यक्रमांतर्गत जीवनकौशल्य, आरोग्य-पोषण, लिंगभाव समता आणि सुरक्षा तसेच आर्थिक साक्षरता या विषयांवर किशोरवयीन मुलांसोबत वर्षभर संवाद तसेच त्यांना ज्ञान देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे होते.
या कार्यक्रमाला एम्पॉहर इंडिया या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनामरा बैग, वरिष्ठ व्यवस्थापक दीप्ती हजारी उपस्थित होते. संतोष शेडगे यांनी उपस्थित शाळेतील सर्व केंद्रप्रमुख, आणि मुख्याध्यापकांना सांगितले की, एम्पॉहर इंडिया अंतर्गत सेतू कार्यक्रम सर्व किशोरवयीन मुला-मुलींपर्यंत तसेच त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून सर्व मुले ही जीवनकौशल्य शिकून सक्षम बनतील तसेच त्यांच्या सामाजिक परिस्थितीला सामोरे जाऊन एक सुजाण नागरिक घडले पाहिजे. या संस्कारक्षम वयात ही कौशल्ये मनात कायमस्वरूपी रूजली पाहिजेत. तसेच मासिकपाळी हा विषय सर्वांसाठी घेणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत मागील वर्षी ज्या शाळांमध्ये संस्थेने काम केले होते त्यातील उत्कृष्ट शाळा, उत्कृष्ट मुख्याध्यापक व उत्कृष्ट शिक्षक असे पारितोषिक वितरण सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हा सेतू कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्ही सोबत आहोत याची हमी दिली.