कवी सौमित्रांच्या काव्यसरींनी रसिक मंत्रमुग्ध

| अलिबाग | अतुल गुळवणी |
ऊन जरा जास्त आहे , दरवर्षी वाटत
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत
तरी पाऊले चालत राहतात मन चालत नाही
दुपार टळून संध्याकाळचं सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हा मागून चालत येते गार गार कातरवेळ
चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो
पावसा आधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो


अशा बहारदार कविता सादर करीत कविवर्य सौमित्र ऊर्फ ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अलिबागच्या रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडले निमित्त होते. कदम यांच्या प्रकट मुलाखतीचे.आरसीएफमधील स्थानिय लोकाधिकार समितीच्यावतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत किशोर कदम यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम कुरुळ कॉलनीतील आरसीएफ सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्यांनी आपल्या जीवनाचा पट उपस्थितांसमोर उलगडला.शिवाय रसिकांना भावणार्‍या कविताही विविध स्वरुपात सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

कृषीवलचे मुख्य संपादक राजेंद्र साठे आणि आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांनी कदम यांची मुलाखत घेतली. यावेळी कार्यकारी संचालक अनिरुध्द खाडिलकर, कार्यकारी संचालक (प्रचालन)सुनील ठोकळ, महाव्यवस्थापक प्रशांत बढे,महाव्यवस्थापक शशिकांत उखळकर, मुख्य व्यवस्थापक एचआर विनायक पाटील ,स्थानिय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी आणि रसिक उपस्थित होते.

कदम यांनी आपल्या जीवनातील घटनांचा उहापोह यानिमित्ताने घेतला.लहानपणापणापासून पाऊस आणि समुद्राविषयी वाटणारे आकर्षण,शाले जीवनात काहीतरी करुन दाखविण्याचा केलेला निर्धार यांची जंत्रीच सादर केली.महाविद्यालयीन जीवनात केलेल्या एकपात्री प्रयोगातून निर्माण झालेली रंभभूमीची आवड.त्यातून मग ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे यांच्याकडे घेतलेले अभिनयाचा धडे यांची माहिती त्यांनी रसिकांना दिली. तब्बल 15 वर्ष ते सत्यदेव दुबेंकडे अभिनयाचे शिक्षण घेत होते. एका कार्यक्रमामध्य दुबेंजी आणि त्यांची पहिली भेट कशी झाली ते सांगितले. अभिनय शिकण्यासाठी दुबेजींकडे गेलेल्या किशोर कदम या नवख्या मुलाला दुबेजींनी हृदय हे नाटक सुरु असताना नाटक रेकॉर्ड करायला सांगितले. रेकॉर्डिंग न झाल्यामुळे दुबेजी किशोर यांच्यावर प्रचंड चिडले. सत्यदेव दुबे फार शिस्तप्रिय होते. एकही चूक त्यांना चालत नसे. केवळ अभिनय नव्हे तर त्यांच्यामुळे अगदी तिकीट विक्रीपासून रंगमंच कसा लावायचा.कुणाची एन्ट्री कशी करुन घ्यायची याचे धडे देखील आपल्याला मिळाले असे ते म्हणाले.अनेकदा त्यांची नाटके बघताना सुचलेल्या कविता आपल्याला नेहमीच स्फूर्ती देत राहिल्या असे सांगताना कदम यांनी

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्‍यान उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे,तल्लीन हो


ही कविता सादर करुन उपस्थित रसिकांची वाहव्वा मिळविली. चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा उलगडा करताना किशोर कदम यांनी अनेक दर्जेदार दिग्दर्शकांकडे विविध भूमिका करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्यातून माझ्यातील एक कलावंत तयार होत गेला.यावेळी त्यांनी कवी गुलजार यांच्याविषयी कृृतज्ञता व्यक्त केली.एका नामवंत कवीचा मी चांगला मित्र असल्याचे भाग्य मला लाभले असे त्यांनी सुचित केले. प्रत्येकाच्या आयुष्यात दोन बायका असतात असा गौप्यस्फोट किशोर कदम यांनी सभागृहात केला.तेव्हा सारेच अचंबित झाले.ती शांतता पाहून इतके गंभीर होऊ नका,मी सहज बोललो असे सांगताच एकच हशा पिकला. एक लग्नाची आणि दुसरी लग्नाआधीची.असे ते म्हणाले.

नवीन प्रकल्पाविषयी काय असा प्रश्‍न ज्यावेळी विचारला त्यावेळी त्यांनी हसत हसत नवीन प्रकल्प म्हणजे उद्या सकाळी अकराची कॅटमरान पकडून मुंबईला जाणे आणि दुसरे म्हणजे गॅसवर दूध ऊतू न जाऊ देणे,असे हसत हसत उत्तर दिले.मी कुठलीही गोष्ट ठरवून करीत नसतो.अथवा माझ्याकडूनही तशी गोष्ट ठरवून घडत नसते.जे जमलं तेच करतो,तोच माझा प्रकल्प असतो.असे उत्तर दिले.
यावेळी स्थानिक लोकाधिका समितीचे कार्याध्यक्ष संजय धारिया यांनी प्रास्ताविक केले.यानिमित्ताने महाराष्ट्र गीत संजय रावले, भारती पोटे, अल्पना भिवरे, दिपाली आढाव, हृषिकेश म्हात्रे, प्रणित दबके यानी सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव राऊत तर आभार अभय घरत यांनी मानले.

Exit mobile version