। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या दिवसेंदिवस मोकळ्या जागेवर बेकायदा पद्धतीने अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमणाद्वारे लहान-मोठे तंबू टाकून अनधिकृतपणे दुकाने उभारली जात आहेत. एवढेच नव्हे, तर कामोठे सेक्टर 5 परिसरातील तलावाच्या पात्रात थेट डेब्रिज आणि मातीखडी यांचा भराव करून ती जागा व्यावसायिक दृष्टीने वापर करून अतिक्रमण केले गेले आहे.
कामोठ्यातील तलावाच्या पात्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकून त्या ठिकाणी बेकायदा पद्धतीने भंगार व्यवसाय, गॅरेज, फर्निचरची दुकाने उभारण्यात आलेली आहेत. त्याबाबत येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, नदीच्या पात्रातच थेट भराव करून सुरू असलेल्या या अतिक्रमणाच्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे पनवेल महानगरपालिके मार्फत पावसाळीपूर्वी केली जाणारी नालेसफाईची कामे सुरू केली जात आहेत. पावसामध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा प्रवाह अडथळा येऊ नये, यासाठी उपाय योजनादेखील केल्या जात आहेत. मात्र, कामोठ्यामध्ये थेट तलावामध्येच डेब्रिजचा भराव करून संबंधित प्रशासनाच्या नियमांना अतिक्रमणकर्त्यांनी बगल दिली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील संपूर्ण शहरांमध्ये फिरते पथक नेमून अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.