। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मधील एकमेव असलेले वाहनतळ हे पर्यटकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी वन विभागामार्फत सुरू केले आहे. मात्र ठेकेदारांनी वाहनतळात अतिक्रमण करून बांधकाम साहित्य इतरत्र साठवल्यामुळे पर्यटकांच्या गाड्या वाहनतळात राहण्यासाठी पर्यटकाना तासंतास वाट पहावी लागत आहे. हे बांधकाम साहित्य हटवून वाहनतळात पर्यटकांच्या गाड्या साठी जागा करावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे वन विभागाचे एकमेव वाहनतळ आहे. पर्यटक त्यांच्या खाजगी वाहनातून आल्यानंतर पार्किंगसाठी याच वाहनतळात गाड्या पार्क केल्या जातात. येथे नगरपालिकेची व एमएमआरडीएची कामे सुरू आहेत.त्यामुळे जो ठेकेदार आहे तो जांभा दगड, रेती, ग्रीट, क्ले पेव्हर ब्लॉक याचा फार मोठासाठा याच वाहनतळात साठवण्यात आला आहे.मागील दोन आठवड्यात पर्यटक संख्या वाढली आहे. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना गाडी पार्क करण्यासाठी जाग उपलब्द होऊ शकली नाही. परिणामी पर्यटकांनी माथेरान कडे पाठ फिरवली तर काही पर्यटकाना तासन्तास ताटकळत राहावे लावले होते. काही गाड्या जुमापट्टी येथे पार्क करून ज्यादा पैसे खर्च करून पुन्हा माथेरान मध्ये यावे लागले. असे असताना वन विभागाकडून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी करतात तरी काय? असा सवाल पर्यटकांकडून विचारला जात आहे.
वाहनतळात बांधकाम विभागाचे साहित्य भरपूर ठिकाणी साठवून ठेवले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या कमी गाड्या पार्क झाल्या. जर वन विभागाने बांधकाम साहित्य हटविण्यास ठेकेदारास सांगितले असते तर पर्यटकांच्या गाड्या पार्क झाल्या असत्या.
– प्रकाश सुतार, स्थानिक
वाहनतळ खूप मोठे आहे. पण गाड्या खूप कमी लागल्या होत्या. आमची गाडी लावण्यासाठी पूर्ण वाहनतळ फिरलो पण जागाच नव्हती अखेर आतील गाडी पार्किंग बाहेर गेल्यानंतर आमची गाडी पार्क झाली. गाडीची पार्किंग फी घेतली जाते. मग तसे गाडी लावण्यासाठी संबंधितांकडून जागा उपलब्ध करून द्यायला हवी पण तसे होत नाही याचा नाहक त्रास आम्हा पर्यटकाना सहन करावा लागतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन पार्किंग व्यवस्था सुरळीत केली पाहिजे. आमची गाडी जर पार्क झाली नाही तर आम्ही माथेरान मध्ये कसे राहणार?
– यशवंत कोळी, पर्यटक, ठाणे
ज्या ठेकेदारांचे बांधकाम साहित्य आहे अशांना अगोदरच नोटीस दिल्या होत्या. फक्त 28 मे च्या दिवशी जास्त पर्यटक आल्यामुळे गाड्या उभ्या राहू शकल्या नाही. मात्र 4 जून रोजी सर्व गाड्या उभ्या राहिल्या. तरी सुद्धा सर्व ठेकेदारांसोबत मिटिंग घेऊन त्यांना शेवटची समज देणार आहे.
– उमेश जंगम, वनक्षेत्रपाल