राज्यमार्गावर भंगारवाल्याचे अतिक्रमण

नेरळ-कल्याण मार्गावरील घटना; विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातुन ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी असलेल्या कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर भंगारवाल्याने अतिक्रमण केले आहे. याच भंगारवाल्याने आपले साहित्य चक्क रस्त्यावर ठेवले होते. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून जेसीबी लावून ते भंगार तेथून हटवले होते. मात्र, पुन्हा एकदा कर्जत-कल्याण रस्त्यावर भंगारवाल्याने आपले भंगार पुन्हा रस्त्यावर आणले आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्द सोडल्यानंतर कर्जत-कल्याण राज्यमार्ग ममदापुर ग्रामपंचायत हद्द आहे. त्या भागात नेरळ विद्या मंदिर शाळा असून या शाळेच्या रस्त्यावर भंगारवाल्याने रस्त्याच्या जागेत अतिक्रमण केले आहे. राजमार्ग रस्त्यावर रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटरची जमीन सार्वजनिक बांधकाम खात्याची असते. मात्र, डांबरी रस्त्यापर्यंत हे अतिक्रमण येऊन थांबले आहे. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. तर रस्त्याच्या डांबरी पट्ट्यापर्यंत हा भंगारवाला येऊन पोहचल्याने त्या व्यावसायिक याला कोणत्या नेत्याचे आशीर्वाद आहेत याबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात त्या भंगार वाल्यावर कारवाई केली होती. मात्र, तरीदेखील पुन्हा त्या भंगारवाल्याने आपले साहित्य रस्त्यावर आणून ठेवले आहे. त्या रस्त्याने येणारे जाणारे विद्यार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी त्या भंगारवाल्याचे अतिक्रमण रस्त्यावर आणि रस्त्याच्या जागेवरून पूर्णपणे काढण्याची गरज तेथील दोन्ही शाळांकडून बांधकाम खात्याला निवेदन देऊन केली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने पावसाळ्यात त्या ठिकाणी जेसीबी मशीन लावून रस्त्यावर आलेले भंगार हटवले होते. मात्र, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या जागेत भंगार ठेवण्यास प्रतिबंध करणारी नोटीस भंगार विक्रेत्याला बजावली नव्हती. त्याचा परिणाम आता पुन्हा एकदा रस्त्याचा मोठा भाग भंगार विक्रेत्याने व्यापला आहे.

Exit mobile version