पालिका हद्दीतील अतिक्रमण रोखण्यात अपयश
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पालिका हद्दीत रहदारीच्या ठिकाणी पदपथावर हातगाड्या लावून व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेच्या स्थापने नंतर अतिक्रमन विभाग वाढत्या फेरीवाल्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवेल ही अपेक्षा सध्या तरी फोल ठरली असून, विविध माध्यमातून मोकळ्या जागांवर अतिक्रमन करणार्यांचे फावले आहे. पालिका हद्दीत असलेल्या फेरीवाल्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी पालिके मार्फत प्रयत्न केले जात आहेत. या करिता फेरीवाला समिती स्थापित करण्यात आली असून, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण देखील पूर्ण करण्यात आले आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पालिका हद्दीत जवळपास आठ हजार फेरीवाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्या पैकी 3076 फेरीवाले फेरीवाला धोरणा नुसार पात्र ठरले आहेत. फेरीवाले धोरणा नुसार पात्र ठरलेल्या फेरीवल्यांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासना समोर असतानाच पालिका हद्दीत विविध भागात अतिक्रमण करणार्या फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल आणि खांदा वसाहतीत फेरीवल्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
दूध विक्री केंद्राच्या नावावर अतिक्रमण
दूध विक्री केंद्र चालवण्याच्या परवानग्या घेऊन मोक्याच्या जागा बळकावण्याचे प्रमाण पालिका हद्दीत वाढले आहे. दूध केंद्राच्या नावावर सुरु करण्यात आलेल्या अनेक केंद्रावर दुधा व्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंची विक्री करण्यात येत असल्यामुळे बेकायदेशीर पणे सुरु असलेल्या या केंद्र चालवणार्यांकडील कागद पत्राची चौकशी होणे अपेक्षित आहे.
नर्सरी चालक मोकाट
शोभिवंत झाडे विक्री करण्याच्या नावावर अनेक विक्रेत्यांनी मोकळ्या भूखंडानवर अतिक्रमण केली आहेत. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या या अतिक्रमनावर अतिक्रमण विभागाची मेहेर नजर का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिव्यांगांच्या नावावर अतिक्रमण
दिव्यांग व्यक्तीच्या नावे विविध भागात स्टॉल उभारन्यात आले असल्याने पदपथावरून चालणे अवघड झाले आहे. अनेक स्टॉल वर दिव्यांगाच्या ऐवजी इतर व्यक्ती व्यवसाय करताना दिसत आहेत. पालिकेकडी नोंदी नुसार पालिका हद्दीत 1329 दिव्यांग व्यक्ती आहेत. दिव्यांगांच्या नावावर सुरु असलेल्या स्टॉल ची संख्या नोंदी पेक्षा जास्त असल्याचे दिसून येत असल्याने दिव्यांग व्यक्ती व्यवसाय करत नसलेल्या स्टॉल वर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आठवडी बाजार जोरात
आठवडी बाजाराच्या नावावर पालिका क्षेत्राच्या बाहेरून येणारे विक्रेते मोकळ्या भूखंडावर बेकायदा बाजार भरवत आहेत. तक्रार केल्यास अशा बाजाराविरोधात पालिकेकडून कारवाई केली जाते. पालिकेचे पथक माघारी फिरताच पुन्हा बाजार भरवले जातात.
इतर अतिक्रमना सोबत मास, मटण, मच्छी विक्रेत्यांकडून देखील उघड्यावर विक्री करण्यात येत असून, अस्वच्छ वातावरणात उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या विक्रेत्यांवर देखील लगाम कसण्याचे काम पालिकेच्या अतिक्रमन विभागाकडून होणे अपेक्षित आहे.
दिव्यांग व्यक्तीचे नाव वापरून जर कोणी व्यक्ती गैर प्रकार करत असेल तर अशा व्यक्ती विरोधात आणि तो करत आलेल्या व्यवसाया विरोधात पालिकेकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.
सुरेश मोकल
कोकण विभाग अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था
दिव्यांग व्यक्तीच्या नावे अथवा दूध केंद्र चालवण्यासाठी ज्यांनी 2016 पूर्वी स्टॉल उभारले आहेत त्यांना तूर्तास अभय देण्यात आले आहे. मात्र नव्याने जर कोणी असे स्टॉल उभारत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही.
कैलास गावडे
उपायुक्त






