कोंडविल समुद्रकिनारी अतिक्रमण

वनविभाग, मेरिटाईम बोर्डाचे अक्षम्य दुर्लक्ष

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

कोंडविल समुद्रकिनारी हॉटेल व्यावसायिकांकडून शासकीय जमिनीवर (वनखाते व महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असून, संबंधित शासकीय विभागांनी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सदर जमीन ही वन खात्याच्या ताब्यात असून, वन खात्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील वन खात्याच्या जमिनीवर सुरू व केतकी यांसारख्या झाडांची तोड करून रस्ते तयार करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी काँक्रिटीकरण करून लाद्या बसविण्यात आल्या आहेत. वन कायद्यानुसार झाडांची कत्तल व अतिक्रमण हा दंडनीय गुन्हा ठरत असताना संबंधित अधिकारी मात्र ‌‘मोजणी सुरु आहे’ असे कारण पुढे करीत गप्प बसल्याचे समोर आले आहे. हॉटेल व्यावसायिकांनी एवढ्यावरच समाधान मानले नसून, मेरीटाईम बोर्डाच्या हद्दीतही अनधिकृतरीत्या आरसीसी पायऱ्या बांधून समुद्रात उतरण्यासाठी मार्ग बांधले आहेत.

या अतिक्रमणाकडे मेरीटाईम बोर्डानेही दुर्लक्ष केल्याने शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्यांवर क्षुल्लक अतिक्रमणासाठी नोटीस, दंड, कारवाई अशा प्रक्रिया तातडीने राबविल्या जातात. मात्र, धनदांडग्यांची उघडपणे पाठराखण केल्याचा उघड पुरावा समोर दिसत आहे. ‌‘शासनाला असे निष्क्रिय अधिकारी हवेत तरी कशाला?’ असा जळजळीत प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

गेल्या काही काळात श्रीवर्धन नगरपरिषदेच्या हद्दीत समुद्रकिनारी काही रस्त्यांना वनविभागाने निर्बंध लावल्याच्या घटना घडल्या असताना कोंडविल येथे काँक्रिटीकरण व अतिक्रमण खुलेपणाने सुरू राहणे, ही गंभीर गोष्ट ठरत आहे. या पाठीमागील रहस्य नेमके काय, याची चौकशी जिल्हा वनक्षेत्रपाल या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी लेखी तक्रारी वरिष्ठ कार्यालयांकडे दाखल करण्यात आल्या असून, स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशी, अतिक्रमण हटविण्याची त्वरित कारवाई करण्याची व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version