दिवाळीनंतर कारवाईचे संकेत
समस्येला वाचा फोडल्याबद्दला कृषीवलला धन्यवाद
रोहा | प्रतिनिधी |
रोह्यातील कुंडलिका नदी सुशोभिकरण प्रकल्पाच्या लगत अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या राहात असलेल्या टपर्या, दुचाकी व चारचाकी वाहने, आगंतुक लोकांच्या राहुट्या यामुळे कुंडलिका नदीसंवर्धन व सुशोभिकरण प्रकल्पाचे सौंदर्य कमी होत असल्याने कृषीवलमधून दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
रोह्यातील ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. नदीसंवर्धन व सुशोभिकरण प्रकल्पालगत होत असलेले अतिक्रमण याबाबत आ. अनिकेत तटकरे यांनी नाराजी व्यक्त करत अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांना कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे. दिवाळीनंतर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे आमदार महोदयांना दिल्याने दिवाळीनंतर नदीसंवर्धन व सुशोभिकरण प्रकल्पाला पडलेला टपर्या, राहुट्या आणि वाहनांचा वेढा हटवला जाईल, अशी अपेक्षा रोहेकर व्यक्त करत असून, योग्य समस्येला वृत्तपत्रातून वाचा फोडल्याबद्दल कृषीवलला धन्यवाद देत आहेत.