जागेवर ताबा मिळण्यासाठी उभारला लढा, महिला रणरागिणी मैदानात
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील निगडे ग्रामपंचायत हद्दीतील महारवाडा राखीव जागेत अतिक्रमण होत असल्याची तक्रार येथील बौद्ध समाजाच्या वतीने महिलांनी रायगड जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व निगडे ग्रामपंचायत यांच्याकडे केली आहे. याबरोबरच सदरच्या जागेवर लवकरात लवकर ताबा मिळावा अशी मागणी देखील करण्यात आलीय. महार वाड्याची राखीव जागा वाचविण्यासाठी महिला रणरागिणी मैदानात उतरल्या असून न्याय हक्कासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
निगडे ग्रामपंचायत हद्दीत घेरी नदीच्या बाजूला मरीआई देवस्थानासमोर वनविभागाच्या बाजूला सरकार दप्तरी गट नं / स.नं . 48 मध्ये गावनकाशामध्ये महारवाडा अशी नोंद असलेली बौद्ध समाजाची सुमारे 3 ते 4 एकर जागा आहे. सदर जागेमध्ये काही वर्षापूर्वी झोपडया होत्या असे महिलांचे म्हणणे आहे. परंतु काही समाजकंटकांनी आम्ही कामधंदया निमीत्त बाहेरगावी असल्यामुळे सदर झोपडयांची नासधूस करून आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही व्यक्तीनी बौद्ध समाजाची कोणतीही परवानगी न घेता कोणताही करार न करता या जागेवर पक्की घर बांधली आहेत. त्यामुळे आमची हक्काची जागा असताना आम्ही बेघर झालो आहोत . असा संताप महिलांनी व्यक्त केला आहे. तसेच सदर ठिकाणी आम्ही आमच्या झोपडया / घरे बांधण्यासाठी गेलो असता काही व्यक्तीनी आम्हाला दमदाटी करून हाकलून लावले असल्याचे महिलांनी म्हटले आहे.
सदर व्यक्तीविरोधात अनुसुचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंध कायदेनुसार कारवाई करून सदर जागा खाली करून ताबा मिळवून द्यावा अन्यथा आम्ही सर्व समाजबांधव आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय. महारवाड्याची जागा वाचविण्यासाठी पुकारलेल्या लढ्यात ललिता कांबळे,अंजना कांबळे, पुष्पा कुलकर्णी, जान्हवी कांबळे, मनीषा कांबळे, मालती गायकवाड, अश्विनी गायकवाड, अनुसया कांबळे, संगीता राणे, जनार्दन सोनावणे, कोमल कांबळे, जयश्री कांबळे, शोभा सोनावणे, मंगला कांबळे, अक्षधा कांबळे आदींसह महिला व समाज बांधव आपल्या हक्काच्या जागेसाठी लढत आहेत. सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी तहसीलदार यांना यासंबंधी प्रचलित शासन निर्णय, परिपत्रके नियम, व अधिनियमातील तरतुदी नुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.आता तहसीलदार यावर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
सदरची जागा महारवाडा राखीव क्षेत्र असून त्या जागेवर अतिक्रमण झाले असल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, लवकरच या जागेची सरकारी मोजणी केली जाईल. शिवाय या जागेवर पूर्वापार वास्तव असणे अथवा काही पुरावे तपासून पुढील निर्णय घेतला जाईल. – कल्पना म्हात्रे, सरपंच निगडे ग्रामपंचायत