ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशयाची सुई
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळमधील कचरा डेपो अनेक कारणांनी सतत चर्चे असतो. त्यात आता या डंपिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेली काही जमीन विकण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशयाची सुई आली आहे. दरम्यान, या प्रकाराने नेरळमध्ये खळबळ माजली असून, नेरळकर संतप्त झाले आहेत.
नेरळ ग्रामपंचायतीच्या डंपिंग ग्राउंडसाठी असलेल्या सुमारे साडेपाच एकर जमिनीपैकी तब्बल सव्वा ते दीड एकर जमीन विकासकाच्या ताब्यात गेल्याचा आरोप समोर येत आहे. हा प्रकार केवळ अतिक्रमण होऊन जमीन एका व्यक्तीच्या नावे करण्यापर्यंत पोहचला आहे. ज्या जमिनीचा उपयोग सार्वजनिक कारणासाठी होणार आहे, त्याच जमिनीवर एका विकासकाने ताबा केलेला दिसत आहे. या ठिकाणी सामान्य रहिवाशांनी दोन-चार फुटांचे अतिक्रमण केले, तर ग्रामपंचायत तातडीने जेसीबी घेऊन धावते, असे स्थानिकांचे मत आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी झालेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने जेसीबीच्या माध्यमातून हटवले होते.त्यानंतर पुन्हा ते कसे उभे राहिले? कोणाच्या दबावामुळे प्रशासन गप्प बसले? आणि या संपूर्ण प्रकरणामागे काही आर्थिक गणित आहे का? असा प्रश्न नेरळ ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या सरकारी मोजणीमध्ये जवळपास पावणेपाच एकर जमीन ग्रामपंचायतीच्या नावावर निश्चित झाली होते. तरी त्यातील सुमारे दीड एकर जमीन विकासकाच्या ताब्यात कशी गेली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मालकी हक्कांचा तपास घेण्याची मागणी तसेच त्या जमिनीवर बांधकाम परवानग्या कोणी दिल्या आणि ग्रामपंचायतीने यापूर्वी केलेल्या कारवाईचीही चौकशी करा, अशी मागणी होत आहे.







