। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहरातील राजीवडा गावातून जाणार्या रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणाची उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांसह रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकार्यांनी पाहणी केली. विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी ही पाहणी करण्यात आली होती. शहरविकास आराखड्यानुसार 9 मीटरचा रस्ता अनधिकृत बांधकामामुळे 9 फूट इतकाच राहिला असल्याचे निदर्शनास आले आहे.
राजीवडा गावातच राहणार्या एका रिक्षा व्यावसायिकाने राजीवड्यातील अरुंद रस्त्यावर असलेल्या रिक्षा थांब्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. या निवेदनात सर्व अतिक्रमण हटवण्याचीही मागणी केली. गेल्या दीड-दोन वर्षांपासून या तक्रारदार रिक्षा व्यावसायिकाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रत्नागिरी नगर परिषदेकडे पाठपुरावा केला जात होता. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रत्नागिरी नगर परिषदेने प्रथम तक्रारीची दखल घेण्यास टाळाटाळ केली होती. परंतु, या रिक्षा व्यावसायिकाने वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या. अखेर मतदान होण्यापूर्वी काही दिवस अगोदर नगर परिषद आणि परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी गावात जावून रस्त्याची पाहणी करण्यात आली.