| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत- मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावर कडाव गावात एसटीची प्रवासी निवारा शेड होती. सदर प्रवासी थांबा येथे करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी करून 24 जुलै रोजी उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने सदर बांधकाम दोन दिवसात जमीनदोस्त करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार दि. 26 जुलै रोजी ग्रामपंचायतीकडून पोलीस बंदोबस्त घेऊन सदर तीन गाळ्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले.
मागील दहा वर्षांपासून कडाव गावातील एसटी बस थांब्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत होते. शासकीय कागदपत्रांची पूर्तता, जागेची छाननी आणि पाहणी यानंतरही संबंधित बांधकामावर कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा निर्णय घेत बेमुदत उपोषण पुकारले. 24 जुलै 2025 रोजी सकाळपासून कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाने हस्तक्षेप करीत ग्रामपंचायतीमध्ये दोन दिवसात बांधकाम जमीनदोस्त केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. ग्रामविकास अधिकारी प्रेमसिंग गिरासे, सरपंच करुणा प्रमोद पवार, कर्जत एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद मोरे, महादेव पालवे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे, हर्षद भोपतराव आणि कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला होता आणि त्यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने दि.26 जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात सदर अनधिकृत बांधकाम हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार दि. 26 जुलै रोजी कडाव ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत अधिकारी प्रेमसिंग गिरासे यांनी पोलिस बंदोबस्त घेऊन सदर अतिक्रमण दूर केले. त्यामुळे त्या जमिनीवर भविष्यात कोणतेही अतिक्रमण होऊ नये, अशी अपेक्षा आंदोलन करणाऱ्या पत्रकारांची आहे.







