| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरात सध्या ही नगरपरिषद आहे की ‘मुक्त बाजार’, असा संतप्त प्रश्न घुमत आहे. कारण परिषदेच्या मालकीच्या जागांवर व्यापारी, गॅरेजवाले आणि फेरीवाल्यांनी उघडपणे अतिक्रमण करून थेट ताबा मिळवला आहे. या बेकायदेशीर कारभारामुळे शहरातील नागरिक अक्षरशः गुदमरू लागले आहेत. उरणमधील रस्ते आधीच अरुंद असताना त्यावर फेरीवाले, हातगाडीवाले यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यात भर म्हणजे व्यापाऱ्यांनी शटरच्या बाहेर दुकानांचा पसारा टाकून रस्तेच गिळंकृत केले आहेत. कोटनाका येथील मासळी मार्केट परिसरात व्यापाऱ्यांनी भररस्त्यात मिरचीसह विविध माल मांडून वाहतुकीचा पूर्ण खेळखंडोबा केला आहे. गॅरेजवाल्यांनी तर सर्व मर्यादा ओलांडून रस्त्यावरच मोटारसायकल दुरुस्ती सुरू ठेवली आहे. सार्वजनिक रस्ता हा खासगी वर्कशॉप असल्यासारखा वापरला जात आहे. या सर्व प्रकारांमुळे उरण शहरात वाहतूक कोंडी ही रोजचीच शिक्षा बनली आहे. रुग्णवाहिका, शालेय बस, कामावर जाणारे नागरिक सर्वच या कोंडीत अडकून त्रस्त झाले आहेत. वेळेचा अपव्यय, इंधनाची नासाडी आणि मानसिक त्रास याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे नगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “पावती फाडा आणि मोकळे व्हा” या पलीकडे प्रशासनाची कोणतीही ठोस भूमिका दिसत नाही. अतिक्रमण हटवण्याची ना इच्छाशक्ती, ना धाडस असे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे.
अतिक्रमणाने नागरिकांचा श्वास कोंडला
