| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी शौचालयाची कमतरता जाणवत असल्याने विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे. तर, शहरात असणाऱ्या शौचालयांची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत राजकीय पक्षांच्या मानसिकतेमुळे नागरिकांना नाक दाबून शौचालयास जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना उमटू लागली आहे.
उरण शहरामध्ये मासळी बाजार, विमला तलाव, देऊळ वाडी व पेन्शनपार्क या चार ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहेत. मात्र, उरण शहराच्या मुख्य प्रवेश द्वारापासून गांधी चौकपर्यंत एकही शौचालय नाही. त्यामुळे या गजबजलेल्या ठिकाणी शौचालय नसल्याने विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे. तसेच, जी चार शौचालय आहेत त्यापैकी काही शौचालयांचे दरवाजे मोडक्या अवस्थेत आहेत. तेथील लाद्या देखील उखडलेल्या अवस्थेत आहेत. तर, काही ठिकाणी पाणी नसल्याने अस्वच्छता पसरुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराईला आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे या घाणीमधून प्रांतविधीला जायचे कसे, हा प्रश्न नागरिकांना पडत असून त्यांना नाक दाबून शौचालयामध्ये जावे लागत आहे. एकंदरीत स्वच्छतेच्या नावाखाली लाखों रुपयांचा खर्च करणारी उरण नगरपरिषद शासनाच्या स्वच्छता अभियानाला हारताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. तरी उरण नगर परिषदेतील सत्ताधारी व विरोधक यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.







