दिघोडे चौकातील अतिक्रमण हटवले

काँक्रिटीकरणाच्या कामाला होणार सुरुवात

| उरण | वार्ताहर |

रानसई ते चिर्ले या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून बुधवारी (दि.17) पासून दिघोडे चौकातून हाती घेतली आहे. त्यामुळे आता दिघोडे चौकांने मोकला श्वास घेतला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.

जेएनपीएच्या अनुषंगाने उरणच्या पूर्वभागात मोठ्या प्रमाणात कंटेनर सीएफएस जाळे पसरले आहे. त्यामुळे रानसई ते चिर्ले,दिघोडे ते चिरनेर या रस्त्यावर रात्री अपरात्री अवजड वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. वारंवार होणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस़्‌‍त्याची दुरवस्था होऊन मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने त्याचा नाहक त्रास विद्यार्थी, नोकरवर्ग, रुग्ण यांना सहन करावा लागत आहे. हा मार्ग अद्यावत व्हावा अशी मागणी सातत्याने दिघोडे गावचे सरपंच किर्तीनीधी ठाकूर, विलास पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी लावून धरली होती.

शासनाच्या हॅम या योजनेतून रानसई धरण ते चिर्ले या रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामासाठी जवळपास 41 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्याचे टेंडर होऊन ठेकेदारही नेमण्यात आले आहे. लवकरच या कामाला सुरुवात होत आहे. मात्र, हा रस्ता पूर्वी एमआयडीसीच्या मालकीचा असल्याने आणि आत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याकडे वर्ग केल्याने रस्त्याच्या दोन्ही जागेमध्ये अतिक्रमण वाढले. या वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ता बनवण्यासाठी अडथळे निर्माण होत होते.

त्या अनुषंगाने हे अडथळे, अतिक्रमण दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मे.पी.पी.खारपाटील कन्स्ट्रक्शन प्रा.लि.या कंपनीच्या (ठेकेदाराच्या) माध्यमातून बुधवारी ही मोहीम पोलीस बंदोबस्तात हाती घेतली आहे. त्यामुळे या दिघोडे चौकांनी सध्या तरी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे होणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरण कामाला कोणताही अडथळा निर्माण होणार नसल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version