| उरण | वार्ताहर |
19 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील चिरनेर येथील शेकडो रहिवाशांच्या घरांत पुराचे पाणी शिरुन घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या सर्व पूर परिस्थितीला जबाबदार असणारी नाल्यावरील अतिक्रमणे व नैसर्गिक पाण्याचे बंद झालेले स्रोत आहे. तरी प्रशासनाने आम्हा पूरग्रस्तांना नुकसान भरपाई न देता प्रथमतः चिरनेर गावातील पूरपरिस्थितीला जबाबदार असणारी अतिक्रमणे हटवावी. अन्यथा अशा प्रशासनाचा निषेध व्यक्त करत चिरनेर गावातील पूरग्रस्त महिला आक्रोश मोर्चा उभारतील, असा इशारा चिरनेर गावातील महिलांनी प्रशासनाला दिला आहे.
उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशाची अंमलबजावणी म्हणून कोप्रोली विभागाचे मंडळ अधिकारी सी.आर. पाटील यांच्या अधिपत्याखाली चिरनेरचे तलाठी के.डी.मोहिते यांच्यासह अन्य तलाठी यांच्या महसूल विभागाच्या पथकाने चिरनेर येथील पूरग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी शुक्रवारी (दि.21) गावाला भेट देऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली.
यावेळी पूरग्रस्त महिलांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले की, आमच्या नुकसानीचे पंचनामे जरुर करा, पण दरवर्षी उद्भवणाऱ्या पुराच्या पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रथम चिरनेर हायवे रोड लगतच्या नाल्यावरील अतिक्रमणे हटवा व रस्त्याच्या मोऱ्यांचे पाणी निचारा होणारे मार्ग मोकळे करा, अन्यथा याविरोधात मोठे आक्रोश आंदोलन उभारले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या जयवंती गोंधळी यांनी उपस्थित महिलांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला दिला आहे. यावेळी चिरनेर गावातील पूरग्रस्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.