महाजनेमध्ये वर्षावास कार्यक्रमाची सांगता

प्रदिप रसाळ यांनी केले उपस्थितांना संबोधित

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा अलिबाग दक्षिण विभागाच्यावतीने वर्षावास कार्यक्रमाचा सांगता समारंभ महाजने येथील बुध्दविहारात पार पडला. माजी अध्यक्ष प्रदिप रसाळ यांनी यावेळी मार्गदर्शन करून उपस्थितांना संबोधित केले.


तालुका शाखेचे अध्यक्ष दिनेश रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. यावेळी तालुका कोषाध्यक्ष बाळाराम जाधव, महिला उपाध्यक्ष शालीनी गायकवाड, कार्यालयीन सचिव महेश जाधव, ऑडीटर प्रकाश जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, महाजने, रामराज, बेलोशी, उमटे, रेवदंडा येथील पदाधिकारी बौध्द ग्रामस्थ, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी प्रदिप रसाळ यांनी सांगितले, समाजात असलेली विषमता दूर करण्यासाठी विज्ञानावर अधारित असलेला बौध्द धम्मच दीन दुबळ्यांना तारू शकतो, हे बाबासाहेबांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लाखो अनुयायींच्या उपस्थितीत नागपूर येथे 67 वर्षापूर्वी बौध्द धम्माची दिक्षा घेतली. ज्या समाजाला माणूस असूनदेखील माणसासारखी वागणूक दिली जात नव्हती. त्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला आहे, असे ते म्हणाले. यावेळी वर्षावास प्रवचन मालिकेचे महत्वदेखील त्यांनी पटवून दिले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका शाखा अलिबाग, ग्रामशाखा महाजने, महिला व तरुण वर्गांनी मेहनत घेतली.

Exit mobile version