। गेल्झनकिर्शन । वृत्तसंस्था ।
सामन्याच्या पूर्वार्धात ज्युड बेलिंगहॅमने साधलेल्या ताकदवान हेडिंग गोलच्या बळावर गतउपविजेत्या इंग्लंडने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या क गटात सर्बियावर 1-0 फरकाने निसटता विजय संपादन केला. इंग्लंडने विजयाचे पूर्ण गुण वसूल केले; पण उत्तरार्धात त्यांना गोल नोंदविता आला नाही. इंग्लंडला आता गटात अव्वल स्थान मिळाले आहे.
क गटातील आणखी एका सामन्यात स्लोव्हेनियाने पिछाडीवरून डेन्मार्कला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. 17व्या मिनिटाला ख्रिस्तियन एरिक्सनने डेन्मार्कसाठी गोल केल्यानंतर एरिक यान्झा याने 77व्या मिनिटाला स्लोव्हेनियास बरोबरी साधून दिली. पुढील लढतीत 20 जून रोजी स्लोव्हेनियासमोर सर्बियाचे, तर डेन्मार्कसमोर इंग्लंडचे आव्हान असेल. 20 वर्षे आणि 353 दिवसांचा असताना बेलिंगहॅम युरो करंडक मुख्य फेरीत इंग्लंडतर्फे गोल करणारा तिसरा सर्वांत युवा फुटबॉलपटू ठरला. बुकायो साका याचा प्रतिस्पर्धी खेळाडूस चाटून आलेल्या क्रॉस पासवर बेलिंगहॅमने 13व्या मिनिटाला अफलातून हेडिंग साधले. उत्तरार्धातील खेळात सर्बियाने आक्रमणावर जास्त भर देत इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. सामन्यानंतर बेलिंगहॅमने इंग्लंडच्या कामगिरीचे विश्लेषण करताना सांगितले की, मला वाटतं, कोणत्याही संघाविरुद्ध आम्ही गोल करू शकतो हे पूर्वार्धात दाखवून दिले आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आम्ही क्लीन शीट (गोल न स्वीकारणे) राखू शकतो, हे उत्तरार्धात सिद्ध केले. मात्र, इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने संघाची कामगिरी अपेक्षेनुसार नसल्याचे मान्य केले. तो म्हणाला, एकंदरीत आम्ही विजयासाठी पात्र होतो. उत्तरार्धात काही कालावधीत आम्हाला आमच्या गोलक्षेत्रातच तळ ठोकावा लागला. त्यातून बाहेर पडणे आम्हाला कठीण ठरले, तरीही हा एक महत्त्वाचा विजय ठरला.