इंग्लंडचा सुपर आठ मध्ये विजय

| सेंट लूसिया | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकमधील दुसऱ्या सुपर आठच्या लढतीचा फैसला अखेर झाला आहे. इंग्लंडने यजमान वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. इंग्लंडने आठ विकेटने दणदणीत विजय मिळवून देत पुढचे पाऊल टाकले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने 20 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडने 18 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला. इंग्लंडकडून फिल सॉल्टने दमदार कामगिरी केली. फिल सॉल्टने नाबाद 87 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. फिल सॉल्ट आणि जॉनी बेयरस्टो या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने विजयाला गवसणी घातली.

इंग्लंडला सुपर आठमध्ये प्रवेश मिळेल की नाही अशी स्थिती असताना ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडला पराभूत केल्याने त्यांना पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला. आजच्या मॅचमध्ये फिल सॉल्ट आणि जोस बटलरने आक्रमक सुरुवात केली. जोस बटलर 22 धावा करुन बाद झाला. यानंतर फिल सॉल्टने 5 षटकार आणि 7 चौकारांच्या जोरावर नाबाद 87 धावांची खेळी केली. या खेळीने इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. तर, मोईन अली 13 धावा करुन बाद झाला. यानंतर मैदानात फलंदाजीला आलेल्या जॉनी बेयरस्टोने संघाला विजय मिळवून देण्याासाठी फिल सॉल्टची मदत केली. जॉनी बेयरस्टोने नाबाद 48 धावा केल्या.

वेस्ट इंडिजचा स्पर्धेतील पहिला पराभव
वेस्ट इंडिजने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले होते. अफगाणिस्तान विरुद्ध 100 हून अधिक धावांनी मॅच जिंकल्याने वेस्ट इंडिजचा आत्मविश्वास वाढला होता. आजच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने 180 धावा केल्या. मात्र, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी फलंदाजी करताना जे चेंडू डॉट खेळले ते त्यांच्या अंगलट आले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी 49 बॉल डॉट खेळले. म्हणजेच जवळपास आठ ओव्हर वेस्ट इंडिजने रन केल्या नाहीत. तर, इंग्लंडने केवळ 16 बॉल डॉट खेळले. इंग्लंडने वेस्ट इंडिजला आठ विकेटने पराभूत केलं. वेस्ट इंडिजचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. ग्रुप स्टेजमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव झाला नव्हता.
Exit mobile version