विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये लवकरच इंग्रजीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे आता तेथे शिकणारी मुले फाड फाड इंग्लिश बोलणार आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती कमी होणार आहे.
रायगड जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दरवर्षी घसरत आहे. तसेच विद्यार्थी नसल्याने दोन वर्षांत सुमारे 51 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या पाश्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या विविध संघटनांसोबत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू आहेत. मात्र अंगणवाड्यांमध्ये बालकांना इंग्रजी शिकविले जात नसल्याने पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान मिळण्यासाठी खासगी शाळांच्या पूर्व प्राथमिक वर्गामध्ये प्रवेश घेतात. प्राथमिक शिक्षण घेतानाही हा प्रवेश कायम ठेवला जात आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या काही प्रमाणात घसरत असल्याचे शिक्षकांच्या संघटनांनी सांगितले.
विशेष अभ्यासक्रम
जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना इंग्रजी भाषेचे प्राथमिक धडे देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षात निवडक अंगणवाड्यांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. यानंतर टप्याटप्प्याने सर्व अंगणवाडी शाळांमध्ये इंग्रजीचे धडे गिरवले जातील. या उपक्रमासाठी विशेष अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्य तयार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच इंग्रजीचे ज्ञान लहान वयात मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
शिक्षक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या सुधारण्यासोबत विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कोणते उपक्रम राबवण्यात यावेत याविषयी चर्चा करण्यात आली. त्यानुसार अंगणवाडीपासून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती, महिला व बालविकास सभापती तसेच सर्व पदाधिकारी, अधिकारी याबाबत सकारात्मक असून, या उपक्रमासाठी विशेष अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्य तयार करण्यात येणार आहे.
– मधुकर पाटील,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद रायगड
