विद्यार्थ्यांना प्रबोधनाचे धडे

शापूरजी पालोनजी यांचे विशेष सहकार्य

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

पडसरे येथे गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा मार्गदर्शक ज्ञान प्रबोधिनी, शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणेद्वारा अनु. आश्रमशाळा हा विकास मित्र प्रकल्प शापूरजी पालनजी ग्रुप मुंबई यांच्या आर्थिक सहयोगाने सुरु आहे. या प्रकल्पाअंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा दोन ते तीन दिवसाच्या शिबिराचे आयोजन केले जाते. जुलै महिन्यात तसेच 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीत शिबीर घेण्यात आले.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच स्वयं अध्ययन कौशल्ये, विज्ञान विषयाचा अभ्यास कृतीतून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना याद्वारा मिळत आहे. इयत्ता पाचवी ते सातवीसाठी विज्ञान शिक्षणासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये जसे कि निरीक्षण, प्रश्‍न, वर्गीकरण, मापन, परिसर अभ्यास इत्यादी प्रत्यक्ष कृतीतून शिकविले जात आहे. याच्या नोंदी करण्यासाठी छोट्या पुस्तिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना प्रयोग करून समजावले जातात. दाब, गतीचे नियम, चुंबकत्व, ध्वनी यासारख्या संकल्पना प्रयोगाद्वारा विद्यार्थी स्वतः प्रयोग करत शिकत आहेत.

या प्रकल्पाअंतर्गत नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन सणासाठीच्या राख्या मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विविध कला-कौशल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा व्हावी यासाठी ‘असे घडते सुंदर अक्षर’ या पुस्तिकेच्या आधारे मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये स्वतः बद्दल जाणीव जागृती व्हावी तसेच राष्ट्राचा परिचय व्हावा यासाठी राष्ट्रीय जाणीव, भारतीय संस्कृतीची ओळख याच्या परिचयाची सत्र घेतली जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेसेंटेशन, तसेच छोट्या फिल्म दाखविल्या जातात. छोट्या गटात चर्चा केली जाते, विद्यार्थी पुढे येऊन आपली मते स्पष्टपणे मांडतात.
या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध गीत तसेच छोटे खेळ शिकविले जातात. सकाळी ध्यान धारणा तसेच सूर्यनमस्कार व योगासने घेतली जातात. दिवसभर उत्साहाने विद्यार्थी या शिबिरात सहभागी होतात. या शिबिरात इयत्ता पाचवी ते दहावीचे मिळून सुमारे 300 विद्यार्थी लाभ घेत आहेत. तसेच, वाचनाची गोडी वाढावी यासाठी ज्ञान प्रबोधिनीद्वारा प्रकाशित छात्र प्रबोधनचे अंक सर्व विद्यार्थ्यांना वितरीत केले आहेत.

Exit mobile version