अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा

विविध शाळांमध्ये ‘चमत्कारामागील विज्ञान’ कार्यक्रमाद्वारे प्रबोधन

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड शाखेच्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ‘चमत्कारामागील विज्ञान’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रयोगांतून मांडलेले वास्तव आणि प्रभावी व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पाली येथील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये रायगड जिल्हा प्रधान सचिव अमित निंबाळकर यांनी चमत्कारामागील विज्ञान या विषयावर सविस्तर व्याख्यान दिले. भोंदूगिरी कशी चालते आणि त्यामागे कोणते वैज्ञानिक नियम असतात, हे त्यांनी सहप्रयोग सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. दुसरीकडे, सार्वजनिक विद्यालय पेण येथील विज्ञान प्रदर्शनात पेण शाखा प्रधान सचिव जगदीश डंगर यांनी चक्क मांत्रिकाची वेशभूषा करून चमत्कारांचे सादरीकरण केले. हातचलाखी आणि विज्ञानाचा वापर करून भोंदू बाबा लोकांना कसे फसवतात, याचे जिवंत दर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले.

याप्रसंगी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनी ‘चला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवूया’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “जगात भूत, आत्मा किंवा जादूटोणा नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. जर जादूटोणा सत्य असता, तर देशाच्या सीमेवर सैन्य भरती करण्याची गरजच उरली नसती; मांत्रिकच सैन्य म्हणून काम करू शकले असते. भूत केवळ मनात असते. प्राण्यांचे भूत का होत नाही? किंवा एखाद्या हुशार माणसाचे भूत लागून एखादा ढ मुलगा हुशार झाल्याचे उदाहरण का दिसत नाही?“ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारणभाव शोधून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन होईल.

– संदेश गायकवाड, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस, रायगड शाखा

Exit mobile version