मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
। अलिबाग । वार्ताहर ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच मंदिरे दर्शनासाठी खुली असल्याने शुक्रवारी माघी गणेशोत्सवानिमित्त ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर ऐकू आला. पहाटेपासूनच पूजाविधीला प्रारंभ झाल्याने गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरयाचा होणारा गजर, गणपती अथर्वशीर्ष पठणाचा गुंजणारा स्वर, आकर्षक रांगोळ्या आणि गणेश आरतीच्या मंगल सुरावटींनी भक्तीमय झालेल्या वातावरणात माघी गणेश जन्मोत्सव सोहळा रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेला पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वदरविनायक, चिरनेरचा महागणपती आदींसह ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून गणेशमूर्तींची आकर्षक पूजा हे गणेश जयंतीचे वैशिष्ट्य ठरले.