| पाली /बेणसे | वार्ताहर |
महिलांना संघटित करून त्यांच्या सर्वांगिण शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करणे, तसेच विविध उपक्रमातून त्यांना प्रोत्साहन देणे या उदात्त हेतूने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील तिसे ग्रामपंचायत हद्दीतील तळवली येथे होम मिनिस्टर व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमास महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. होम मिनिस्टर स्पर्धेत अनुक्रमे शलाका प्रसाद यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक निधी मनोरे, तृतीय क्रमांक प्रतिभा सोनटक्के, चतुर्थ क्रमांक नीता वडे यांनी पटकाविला. विजेत्यांना अनुक्रमे सोन्याची नथ, पैठणी साडी, चांदीचा पैंजण, चांदीचा दिवा आदी बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास तिसे ग्रामपंचायत सरपंच राकेश कांबळे, उपसरपंच जयेश घावटे, तेजस घावटे, महेंद्र पानसरे, संतोष दपके, वैभव जैतपल, भूषण तेलंगे तसेच महिला वर्गात माधवी तेलंगे, रचना वडे, प्रिती घावटे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल नागोठणेकर, तर आभार माधवी तेलंगे यांनी मानले.