। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग विधानसभा मतदार संघातील टपाली मतदानाला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. अलिबाग तहसील कार्यालयापासून पोलीस अधीक्षक कार्यालयातील समाधान कक्षात टपाली मतदान सुरु झाले आहे. या मतदानाला अधिकारी व कर्मचार्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कर्मचारी स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, श्रीवर्धन, पेण, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदार संघातील मतदान येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे. 24 लाखहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकिय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रीयचे कामकाज चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करीत असताना मतदानापासून ते वंचित राहू नये यासाठी कर्मचार्यांचे टपाली मतदान सुरु करण्यात आले आहे. सातही विधानसभा मतदार संघातील तहसील कार्यालयापासून वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा मतदान केंद्र सुरु करण्यात आले आहे. केंद्रामध्ये टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मंगळवारपासून टपाली मतदानाला सुरुवात झाली. बुधवारीदेखील अलिबागसह अनेक ठिकाणी वेगवेगळया विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. नेहमी आपल्या कर्तव्यात मग्न असणार्या अधिकारी व कर्मचार्यांमध्ये मतदानाचा हक्क बजावताना एक वेगळा उत्साह निर्माण झाला. काहींनी मतदान केल्यावर सेल्फी काढले. तर काही जण मतदान करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले.