आयोजकांचे उत्तम नियोजन
| अलिबाग । हिरामण भोईर।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आ. जयंत पाटील व कार्यवाह तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल मयेकर मित्रमंडळ नागाव यांच्या संयोजनाखाली सुरु असलेल्या नागाव येथील रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला कबड्डी रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. उत्तम नियोजनामुळे स्पर्धेचे महत्व वाढले आहे. अनेक चमकदार सामने प्रेक्षकांची दाद मिळवून जात आहेत.
या स्पर्धेला राज्य कबड्डी संघटनेचे सहकार्यवाह अॅड.आस्वाद पाटील, जि.प.च्या माजी सभापती चित्रा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजकांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
या स्पर्धत पहिल्या दिवशी 64 संघ खेळविण्यात आले आहेत. अनुक्रमे शेवटचे चार संघ नवजीवन पेझारी, म्हसोबा पेझारी, मिडलाईन कर्जत, पांडबादेवी रायवाडी तसेच दिनांक 27 नोव्हेंबर रोजी आर आर कर्जत, जय बजरंग रोहा, म्हसोबा शहापूर, गणेश दिवलांग हे चार संघ पात्र ठरलेत. 28 नोव्हेंबर रोजी जय बजरंग बेली, नवयुवक सोनारसिद्ध धाटाव, चिंतामणी नागाव बंदर, जय हनुमान वाशी-रोहा हे चार संघ पात्र ठरलेत. तर 29 नोव्हेंबर रोजी होणार्या 64 संघाच्या स्पर्धेत चार संघ पात्र ठरतील असे एकूण 16 संघ 30 नोव्हेंबर रोजी होणार्या स्पर्धेत खेळतील. या संघातून रायगड जिल्ह्याचा विजेता संघ ठरविला जाईल. तर महिलांचेही 16 संघ 30 नोव्हेंबर रोजी खेळतील यातूनही महिला संघ अंतिम विजेता ठरेल. या पाच दिवसांच्या पुरुष व महिला अशा एकूण 274 संघातून राज्य स्पर्धेत खेळ्ण्यासाठी रायगड जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ जाहीर केला जाईल.
स्पर्धेचे उत्तम नियोजन
कबड्डी स्पर्धेचे उत्तम असे नियोजन निखिल मयेकर मित्रमंडळ, नागाव ता. अलिबाग या मंडळाने केली आहे. उत्तम अशी चार क्रीडांगणे, क्रीडांगणावर खेळाडूंना उन लागू नये म्हणून त्यासाठी मंडप व्यवस्था, रोज येणार्या पाहुण्यांचा व ज्येष्ठ खेळाडूंचा, क्रीडा कार्यकर्त्यांचा आणि गावातील प्रतिष्ठीत सन्मानचिन्ह भेट देऊन यथोचित गौरव केला जातोय. उत्तम अशी स्टेज व्यवस्था, पंचासाठी दालन, त्यांना टी-शर्ट. या स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी निवडण्यात आलेल्या कमिट्यांचे सदस्य मंडळाला उत्तम सहकार्य करत आहेत. अशी स्पर्धा महाराष्ट्रात कोठेच झाली नसेल ती या मंडळातर्फे पार पाडली जात आहे.