तळ्योजातील उद्योजकही त्रस्त

पाण्यासाठी न्यायालयात धाव


| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार मागील काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. एमआईडीसीकडून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याची गरज भगवण्यासाठी कारखानदारांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे याकरिता कारखानदारांनी न्यायालयाचे दरवाजे थोटावले आहेत. कारखानदारांची संघटना असलेल्या तळोजा मॅन्युफॅक्चरर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालत याचिका दाखल केली असल्याची माहिती टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रींगांरे यांनी दिली आहे.

907 हेक्टर परिसरात वसवण्यात आलेल्या तळोजा औद्योगिक क्षेत्रात जवळपास 850 लहान-मोठे कारखाने आहेत. यामध्ये 114 रासायनिक, तर 226 अभियांत्रिकी कारखान्यांचा समावेश असून, इतर प्रकारची प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांचादेखील औद्योगिक वसाहतीमध्ये समावेश आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांत विविध प्रकारच्या प्रक्रियेकरिता मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. बदलापूर तालुक्यातील बारवी धरणामधून येणाऱ्या जलवाहिनीला खोनी येथे जोडणी देऊन त्याद्वारे तळोजा औद्योगिक परिसराला पाणी पोहोचवले जाते. या जलवाहिन्यांमधून येणारे पाणी थेट औद्योगिक वसाहतीला पुरवणे आवश्यक असताना, इतर प्राधिकरण तसेच गावांनादेखील या जलवाहिनीतील पाण्याचा पुरवठा केला जात असल्यानेच औद्योगिक वसाहतीला टंचाई जाणवत असल्याचा आरोप कारखानदारांकडून केला जात आहे.

दररोज 52 ते 54 दशलक्ष लीटर पाण्याची गरज
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना दररोज 52 ते 54 दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. हा पाणीपुरवठा करण्यासाठी औद्योगिक वसाहतीपासून साडेनऊ किलोमीटरवर असणाऱ्या खोनी या ठिकाणावर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीशेजारी असलेली गावं आणि इतर रहिवासी वसाहतींना पाणी दिले जाते, तसेच काही प्रमाणात पाण्याची गळती होत असल्यानेच तळोजातील कारखान्यांना प्रत्यक्षात 20 ते 22 एमएलडी इतक्याच पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप कारखानदार करीत आहेत. तर, एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे.

टँकरच्या पाण्यावर भिस्त
एमआयडीसीकडून कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने अतिरिक्त पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर कारखानदारांची भिस्त आहे. 800 ते 1000 रुपये दराने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने याचा आर्थिक फटका कारखानदारांना सहन करावा लागत आहे.

बारवी धरणामधून येणारे पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून तळोजात आणण्यासाठी ज्या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्या गावांनादेखील द्यावे लागत आहे. त्यामुळे कारखान्यांना कमी प्रमाणात पाणी मिळत असले तरी त्याचे प्रमाण दररोज 30 ते 35 दशलक्ष लीटर इतके आहे.

अविनाश गधडे, उपअभियंता, एमआयडीसी

कारखान्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे याकरिता कारखानदारांनी जून महिन्यात मोर्चा काढून निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरदेखील अपुऱ्या प्रमाणात पाणी येत असल्याने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शेखर श्रींगांरे, अध्यक्ष, टीएमए
Exit mobile version