चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रवेशकर्त्यांचे स्वागत
।अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन मुरूड तालुक्यातील वावे व सर्वे गावांमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शेकापमध्ये जोदार इनकमिंग सुरु झाले असून, शिंदे गटाला मुरूडमध्ये खिंडार पडले आहे. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 16) अलिबागमध्ये छोटेखानी कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे पक्षात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी पुरोगामी अलिबाग तालुका युवक संघटना अध्यक्ष तथा मुरूड तालुका संपर्क प्रतिनिधी विक्रांत वार्डे, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील, संदीप गोणभरे, विनायक चोगळे, विजय गोताड तसेच उमेश कासार, सरोज दिवेकर, ठाकरे गटातील निलेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये (शिंदे गट) वावे व सर्वे येथील काही कार्यकर्ते काम करीत होते. पक्षासाठी काम करत असताना तेथील पदाधिकारी त्यांना विश्वासात न घेता कारभार चालवित होते. गावातील प्रश्न सोडविण्याबाबत फक्त आश्वासने दिली जात होती, असा आरोप प्रवेशकर्त्यांनी केला आहे. शिंदे गटातील शिवसेनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून वेळास्ते ग्रामपंचायत हद्दीतील वावे येथील काशिनाथ खेडेकर, संदीप खेडेकर, संतोष खेडेकर, शुभम खेडेकर, राजाराम महाडिक, संतोष महाडिक, विश्वास खेडेकर तसेच सर्वे येथील शिंदे गटातील कार्यकर्ते व प्रसिद्ध क्रिकेटपटू निखील धारवे यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांनी शेकापचे नेते जयंत पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वावर खुश होऊन शेकापमध्ये प्रवेश केला. दरम्यान, मुरूडचे शेकाप कार्यकर्ते भाऊ दिवेकर, नरेश दिवेकर यांच्या माध्यमातून वावे येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे गटातील शिवसेनेमध्ये काम करीत होतो. मात्र, तेथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत राहिले. त्यामुळे गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ लागला. शिंदे गटातील शिवसेनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून अखेर शेतकरी कामगार पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
– काशिनाथ खेडेकर