| अलिबाग | प्रतिनिधी |
कुर्डूस येथील शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांचन केणी यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पेझारी येथे छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, कुर्डूसचे माजी सरपंच संदीप पाटील, रामचंद्र करवे, सूनील पिंगळे, विश्वनाथ पिंगळे, अरविंद पाटील, रविंद्र पिंगळे आदी पदाधिकारी व शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदे शिवसेना गटात कार्यरत असलेले कांचन केणी यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती. अखेर शिंदे गटाला केणी यांनी रामराम करत, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होत माजी आ. पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापमध्ये प्रवेश केला. केणी यांच्या प्रवेशामुळे कुर्डूसमध्ये शिंदे गटात भगदाड पडले असून असंख्य शिंदे गटाचे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात येण्याची चर्चा सध्या जोरात आहे. त्यामुळे शिंदे गटाला कुर्डूसमध्ये दणका बसण्याची शक्यता आहे.







