3 राज्यातील 40 सहभागींनी केले सर्वेक्षण
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क्स ट्रस्ट व फणसाड अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने भुपृष्टावरील सरपटणारे प्राणी व उभयचर प्राण्यांचे गणना प्रथमच पार पडली. या सर्वेक्षणासाठी 11 राज्यातील एकूण 143 लोकांनी नोंदणी केली होती. यामध्ये 3 राज्यातील 40 सहभागींची निवड करण्यात आल्याची माहिती फणसाड अभयारण्य विभागाने दिली आहे.
मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्य हे मुरुड, रोहा व अलिबाग या तीन तालुक्यांलगत असून सुमारे 52 चौ.कि.मी मध्ये विस्तारलेले आहे. या अभयारण्यात सांबर, भेकर, रानडुक्कर, सायाळ, पिसोरी, शेकरु, बिबटे आदी वन्यजीव आढळतात. या सर्वेक्षणात ग्रीन वर्कचे संस्थापक अध्यक्ष निखिल भोपाळे त्यांची संपूर्ण टीम तसेच वनपाल आदेश पोकळ, वनरक्षक अरुण पाटील, संतोष पिंगळा, प्रदीप बगाडे, सदानंद नाईक आदींनी तिसर्या निरीक्षणात 4 कि.मी. जंगलाची पायवाट तुटवित प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. यावेळी सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्रजातींची ऑनलाईल नोंद घेण्यात आली असून शेवटच्या दिवशी सहभागींना ई-प्रमाणपत्रे देण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान, भारतीय फ्लॅपशेल कासव आणि कॉमन सँड बोआ प्रथमच अभयारण्यात आले असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे.
यावेळी उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, सहाय्यक वनसंरक्षक मनोहर दिवेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड, ग्रीन वर्कचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निखिल भोपाळे व त्यांची संपूर्ण टीम तसेच नांदगाव वनपाल आदेश पोकळ, वनरक्षक अरुण पाटील, संतोष पिंगळा, वनमजुर प्रदीप बगाडे, सदानंद नाईक आदींसह कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला होता.
भुपृष्ठावर सरपटणार्या प्रजातींमध्ये मुख्यतः 16 साप, 20 बेडूक, 10 सस्तन प्राणी, 7 गेको, 3 मॉनिटर सरडे, 1 स्किंक, 2 गिरगिटासह, 45 नागीण, 4 पाली, 3 घोरपड, 50 फुलपाखरु व 104 प्रकारच्या पक्षांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
शास्त्रोक्त पद्धतीने गणना
हा सर्वेक्षण स्टेट बँक ऑफ इंडिया व ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या संयुक्त पुढाराकाने हाती घेतल्यामुळे फणसाड अभयारण्यातील दुर्मिळ जैव विविधतेचा सूक्ष्म आणि स्थूल अभ्यास करून निश्चितपणे काही निरीक्षण नोंदविणे शक्य झाले. तसेच, स्टेट बँकेने अर्थसहाय्य दिल्याने खर्या अर्थाने ही गणना शास्त्रोक्त पद्धतीने होऊ शकली. तसेच, सरपटणारे प्राणी व उभयचर प्राण्यांचे सर्वेक्षण हे सलग 5 वर्षे करायला हवी, असे मत ग्रीन वर्क्स ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले.