‌‘काळ‌’ प्रदूषणाबाबत पर्यावरणमंत्र्यांचे वेधले लक्ष

मंत्री आदिती तटकरे यांनी सादर केले निवेदन; पाणी उकळून पिण्याचे ग्रामस्थांना आवाहन

| माणगाव | प्रतिनिधी |

काळ नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत राज्याच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल, पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी लेखी निवेदन देऊन मंत्री पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधले आहे.

काळ नदीवर तालुक्यातील अनेक गावांतील नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यातच या भागातील गरीब शेतकरी राजा उन्हाळ्यात कलिंगड, भाजीपाला यांसारखी विविध उत्पादने घेत असतात. यावर्षी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच कोकणात यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाई अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. माणगावच्या काळ नदीचे पात्र दिवसेंदिवस कमी होत चालल्याने अनेक ठिकाणी गावागावांतून बंधारे टाकण्याचे काम सुरु आहे. त्यातच माणगावच्या काळ नदीचे पात्र आटल्याने शहरातील व आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्याच्याबाबतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काळनदीचे पात्र आटल्याने या नदीच्या पाण्यावर पिवळसर, हिरवा, नारंगी तवंग भरपूर प्रमाणात जमा झाल्याने आज घडीला हि नदी प्रदूषित झाली आहे. माणगाव नगरपंचायतीतर्फे नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी माणगावकर नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.

नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल,पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, काळ नदीचे पाणी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नदीच्या पाण्यावर माणगाव शहरासह परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. नदीच्या पृष्ठभागावर हिरवट, पिवळसर व लालसर तवंग दिसून येत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे. नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी, बांधकामांमधील सिमेंटमिश्रित पाणी, रासायनिक घटक, प्लास्टिक व इतर कचरा यामुळे प्रदूषण वाढत असल्याची शक्यता आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन नदीच्या पाण्याची तातडीने वैज्ञानिक तपासणी करणे, प्रदूषणाचे स्रोत निश्चित करून ते बंद करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे तसेच संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version