। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरात सामाजिक बांधिलकी जपत बिर्लां कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पाताळगंगा युनिट व पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच पिल्लई एच.ओ.सी. महाविद्यालय, रसायनी यांच्या संयुक्त विद्यमानाने दांडवाडी (आदिवासी पाडा) येथे उल्लेखनीय सामाजिक-पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत परिसरात गल्ली-बोळात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली काढण्यात आली. पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावी करण्यासाठी स्थानिक नागरिकांना कापडी बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने गरजू आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमावेळी कंपनी प्रशासनाचे प्रतिनिधी, ट्रस्टचे पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक-शिक्षक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघशी संलग्न विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व सहभागींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपक्रम यशस्वी ठरला.
पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारी याबाबत समाजात सकारात्मक जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. उद्योग-शिक्षण संस्था-स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने समाजहित साध्य होऊ शकते, हा संदेश या माध्यमातून प्रभावीपणे देण्यात आला.







