पनवेलमध्ये साथरोग बळावले

| पनवेल | वार्ताहर |

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल या भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाला मलेरिया, तसेच डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत.

जुलै महिन्यात पावसाने कहर केला. पनवेल महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे शहरातील आजूबाजूचे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक सखल भागांत पाणी साठले. जून महिन्यातील पावसाने पनवेलच्या प्रवेशद्वारावर पाणी आले होते; परंतु काही दिवसांपासून पावसाने पुन्हा उघडीप घेतली आहे. श्रावण महिना जसा जवळ येत आहे, तसतसा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने वातावरणात पुन्हा आमूलाग्र बदल झाला आहे. पाऊस थांबल्यावर वाढलेली उष्णता, तर कधी पडणाऱ्या पावसामुळे गारवा होत असल्याने डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे बांधकाम प्रादुर्भाव अचानक वाढला आहे. कामोठे, खारघर, तळोजा, कळंबोली आणि नवीन पनवेल नोडमध्ये सुरू असलेल्या बांधकामांमध्ये पावसाचे पाणी साठून त्यात डासांची अंडी घालण्यास मदत होत आहे. त्यामुळे कामोठे आणि खारघरमध्ये सध्या मलेरिया आणि डेंगीचे रुग्ण वाढल्याचे पालिकेचे निरीक्षण आहे.

महापालिका ॲक्शन मोडवर
पावसाळा थांबल्यानंतर पनवेल महापालिकेच्या हद्दीतील काही नोडमधून डासांच्या तक्रारी समोर येत आहेत. प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेतर्फे तात्काळ कार्यवाही केली जात आहे. धुरीकरण, कीटकनाशक फवारणी, आळ्या नष्ट करणे, घरोघरी भेट देऊन नमुने तपासणे, तसेच औषधोपचार देणे आदी काळजी घेतली जात आहे. तसेच पाणी साठू नये, याकरिता काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Exit mobile version