रांजणखार येथील नवरात्र उत्सव मंडळाचा पुढाकार
| खारेपाट | प्रतिनिधी |
रांजणखार येथील नवरात्र उत्सव मंडळाच्या पुढाकारातून बारांचा देव, नवखार येथे पाणपोई उभारून ग्रामस्थांसाठी 24 तास पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मंडळाच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
याप्रसंगी मंडळाचे सदस्य मनोज पाटील, समीर पाटील, परेश पाटील, अतिश म्हात्रे, राजेंद्र पाटील, सुनील म्हात्रे, धनंजय पाटील उपस्थित होते. तसेच नवखारचे पोलीस पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, संतोष पाटील, संदीप पाटील, सुमित भगत, बाबाडीजे, ग्रुप क्रमांक चारचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
नवरात्र उत्सव मंडळ रांजणखारकडून समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जात असून, त्यामध्ये रक्तदान शिबीर, श्रमदान, विद्यार्थ्यांना वह्यावाटप, पूरग्रस्तांना मदत, अन्नदान आणि आरोग्य शिबिरांचा समावेश आहे. या सर्व कार्याचा उल्लेख करत पोलीस पाटील आणि प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून मंडळाचे अभिनंदन केले.
या पाणपोईच्या उभारणीचे काम पाटील ट्रेडर्स यांनी पूर्ण केले असून, गवंडी म्हणून गंगाधर ठाकूर, प्रफुल्ल म्हात्रे, परेश पाटील आणि जयवंत पाटील यांचे विशेष योगदान लाभले. तसेच जीवन म्हात्रे आणि अतिश म्हात्रे यांनी नळयोजनेचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. या पाणपोईमुळे बारांचा देव, नवखार परिसरात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध झाली असून, ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.






