मापगावमध्ये पहिले दल स्थापन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पोलीस यंत्रणा ही कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम करीत आहे. मात्र असे असले तरी प्रत्येक गावाला सुरक्षा देऊ शकत नाही. यासाठी आपले गाव हे तरुणांनी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी उचलणे महत्वाचे आहे. यासाठी ग्राम रक्षक सुरक्षा दल पोलीस विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत स्थापन केले जात आहे. त्यामुळे हे दल गावात पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणार आहे. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत ग्राम रक्षक सुरक्षा दल स्थापन करण्याचा पहिला मान हा मापगाव गावाला मिळाला आहे. गावातील पंधरा होतकरू तरुण या दलात सामील झाले आहेत.
मापगाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस याच्या हस्ते ग्राम रक्षक सुरक्षा दलातील पंधरा सदस्यांना आय कार्ड आणि टी शर्टचे वाटप करण्यात आले. मापंगाव सरपंच उनिता थळे, मापंगाव पोलीस पाटील, बहिरोळे पोलीस पाटील, माजी सरपंच सुनील थळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ग्राम रक्षक सुरक्षा दलाची कर्तव्ये याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून आपत्ती कालावधीत नेहमी सतर्क राहून पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहणेबाबत सूचना पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी दलाला दिल्या आहेत.
ग्राम रक्षक सुरक्षा दल हे गावाच्या सुरक्षेबाबत काम करणार आहे. नैसर्गिक आपत्ती काळात हे दल बचाव, मदत कार्यात सहभागी होईल. गावातील गुन्ह्याबद्दल पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करतील. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी य दलाचे सदस्य मदतीसाठी पुढे येतील. त्यामुळे गावाची सुरक्षा ही दलाच्या माध्यमातून केली जाणार असून पोलिसाचा तिसरा डोळा म्हणून ते काम करतील. अशी माहिती शैलेश सणस यांनी दिली. प्रत्येक गावात ग्राम रक्षक सुरक्षा दल स्थापन करण्यात तरुणाईने पुढे येण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी केले आहे.