बोर्लीपंचतन येथे महिला ग्रामसंघाची स्थापना

| बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
महिला बचत गटांची चळवळ अधिक गतीमान करण्यासोबतच स्वयंसहाय्यता समुहाद्वारे स्त्रियांचे संघटन करुन त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देऊन आर्थिक स्वालंबन व आर्थिक शिस्तीचे धडे मिळावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती(उमेद)अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक गावात महिला ग्रामसंघाची बांधणी सुरु आहे. त्या अनुषंगाने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन

ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या पाच दिवशीय महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या ग्राम संघ प्रशिक्षण शिबिराचा समारोप शनिवार (दि.31) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या पाच दिवशीय मार्गदर्शन शिबीरामध्ये वरिष्ठ वर्धिनी यांनी गावातील बचतगटांना एकत्र करुन ग्रामसंघाची स्थापना केली आणि त्यांना ग्रामसंघाचे कार्य व दशसुत्री याबाबत मार्गदर्शन केले.

यातून स्थापन झालेल्या सह्याद्री ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी मानसी जाधव,मुमताज हद्दादी,आशा पवार, अमृता शिरवटकर यांची सर्वसहमतीने निवड करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती राष्ट्रीय ग्रामिण जिवनन्नोती विभागाचे विस्तार अधिकारी किशोर गोराटे यांनी ग्रामसंघाच्या पाच दिवस चाललेल्या मार्गदर्शन शिबीराचा आढावा घेऊन महिलांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून एकमेकांच्या सहकार्याने छोट्या छोट्या व्यवसायातून आत्मनिर्भर व आर्थिक स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे यासाठी पंचायत समितीकडून महिला ग्रामसंघाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्‍वासन दिले. याप्रसंगी प्रियांका मुरकर,नुजहत जहागीरदार त्याचबरोबर स्वयंसहाय्यता समूहाच्या महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version