100 दिवसांनंतरही लालपरीचे चाक रुतलेलेच

रायगडातील 92 टक्के वाहतूक बंदच
पर्यायी व्यवस्थेची प्रवाशांकडून मागणी

। अलिबाग । नेहा कवळे ।

कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यांतर्गत प्रवास, पर्यटन क्षेत्र यावरील बंधने पूर्णपणे हटवून वाहतूक पूर्ण क्षमतेने चालू आहे. ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या आहेत. अशातच राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी संपामुळे बंद आहे. याचा विपरित परिणाम अलिबागसह संपूर्ण रायगडावर झाला असून, गुरुवारी एसटी संपाचा शंभरावा दिवस असल्याने एसटीला पर्यायी व्यवस्था काय? असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

अलिबाग एसटी डेपोतून सद्यःस्थितीत पेण, पनवेल व ठाणे अशा तीन ठिकाणच्या बसेस सोडण्यात येत आहेत. डेपोत एकूण 288 कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, संपामुळे त्यातील फक्त 24 कर्मचारी आजमितीस कामावर हजर झालेले आहेत. त्यातही फक्त तीन चालक व एक वाहक कामावर रूजू झाले आहेत. तसेच संपात सहभागी झालेल्या व आवाहन करूनही कामावर हजर न झालेल्या 51 जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, चालक व वाहक पूर्ण क्षमतेने हजर राहावे यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याचेही काम आगाराकडून करण्यात येत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांचा 27 ऑगस्टपासून संप अद्यापही कायम आहे. यावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांसह त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला दिलेली 12 आठवड्यांची मुदत गुरुवारी संपली आहे. या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला अभिप्राय देण्याच्या न्यायालयाच्या सूचना आहेत. यामुळे अहवालात विलिनीकरणाबाबत नेमका काय निर्णय होणार? याकडेच एसटी कर्मचार्‍यांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी अद्यापही कामावर हजर व्हावे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी भीती न बाळगता थेट संपर्क साधून लवकरात लवकर कामावर हजर राहावे. – अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग

Exit mobile version