122 वर्षांनंतरही रुग्णालय दिमाखात

माथेरानकरांसाठी ठरतेय नवसंजीवनी

| माथेरान | वार्ताहर |

सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानमध्ये स्थानिक आणि पर्यटकांच्या आरोग्य सेवेसाठी बैरामजी जिजीभाई रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयाला 3 जून रोजी 122 वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांनंतरही या रुग्णालयाची इमारत येथे दिमाखात उभी आहे. एकमेव रुग्णालय असलेल्या या रुग्णालयात आजही चांगले उपचार दिले जात आहेत.

तत्कालीन सी.एस.आय. शेठ बैरामजी जिजीभाई यांच्या स्मरणार्थ माथेरान येथील गरीब लोकांच्या सेवेसाठी या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. सन 1872 च्या ट्रस्ट सेटलमेंटमधून शेठ रुस्तमजी बैरामजी जिजीभाई यांनी रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी आणि ती सज्ज करण्यासाठी त्याकाळी 13,100 इतकी रक्कम दिली होती. या रकमेतून सुसज्ज अशी नियोजनबद्ध इमारत बांधून 23 जून 1902 साली येथे रुग्णालय सुरू करण्यात आले. या इमारतीचा ठराव क्रमांक 5865 जी.डी. हा 12 ऑक्टोबर 1901 रोजी पारित करण्यात आला होता. त्याची साक्ष आजही रुग्णालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेला फलक देत आहे. या इमारतीला 30 फूट उंची देऊन वरच्या बाजूला पूर्ण झडपा काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथे हवा खेळती राहते, त्यामुळे रुग्णाला उकाड्याचा त्रास जाणवत नाही. तसेच पावसाळ्यात पाणी आत येऊ नये, अशा प्रकारच्या डबल झडपा येथे लावल्या आहेत. तसेच हिवाळ्यात थंडी लागू नये यासाठी येथे काळ्या दगड्याच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. रुग्णालयात दोन मोठ्या खोल्या असून, रुग्णांसाठी आठ खाटांची सोय आहे. यातील चार खाटा या महिला आणि लहान मुलांकरिता असून, चार खाटा या पुरुष रुग्णांसाठी राखीव आहेत.

बैरामजी जिजीभाई रुग्णालय माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या अधिपत्याखाली असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांवरही येथे उपचार दिले जातात. अनेकदा माथेरानमध्ये आलेले पर्यटक फिरताना कड्यावरून अथवा घोड्यावरून पडून जखमी होतात, त्यांना उपचारासाठी याच रुग्णालय आणले जाते. त्यामुळे याठिकाणी अद्ययावत सुविधा देण्याची मागणी होत आहे.

धूळ खात पडलेला भाग वापरात आणा
येथील काही बंगलेधारकांनी आपल्या स्वखर्चातून रुग्णालयाला एक्स-रे मशीन, प्रयोगशाळेतील साहित्य भेट म्हणून दिले आहे. ते धूळ खात पडले आहेत. जर हे साहित्य रुग्णालयाच्या वापरात आणल्यास रुग्णांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यासाठी पालिकेच्या मानसिकतेची गरज असल्याचे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

बी.जे. रुग्णालय हे माथेरानकरांसाठी नवसंजीवनी देणारे आहे. येथील एकमेव रुग्णालय असल्याने रुग्ण याच दवाखान्यात उपचारासाठी येतात. कोविडमध्ये या रुग्णालयाने माथेरान सावरले आहे. येथे कमी पैशात उपचार होतात. मात्र, ब्रिटिशकालीन या रुग्णालयाचा काही भाग हा वापराविना आहे. तो वापरात आला तर हे रुग्णालय एक अत्याधुनिक रुग्णालय होऊ शकते.

दीपक जाधव, माजी नगरसेवक, माथेरान
Exit mobile version