| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम मागील दहा वर्षांपासून रखडले असून शासनाने अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयाची नव्यानेच इमारत बांधावी, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. तसेच सध्याच्या इमारतीच्या झालेल्या दुरवस्थेबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी 293 अन्वये विशेष चर्चेची मागणी केली असता सभापतींनी यावर शासनास निवेदन करण्यास सांगितले आहे.
बुधवारी याबाबत उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना आ.जयंत पाटील यांनी जिल्हा रुग्णालयातील आंतर रुग्ण विभागाच्या इमारतीच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले.या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली असून अंतर्गत आणि बाह्यछतांना गळती लागली आहे. प्लास्टर निखळण्याच्या घटनामध्ये वाढ झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला 41 वर्षे झाली असून गेल्या दहा वर्षापासून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्याबद्दल खेदही व्यक्त केला. रुग्णालय प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाकडे स्ट्रक्चरल ऑडिटकरिता लागणारे 7 लाख 23 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यानंतर देखील स्ट्रक्चरल ऑडिट केले जात नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असणे हे अत्यंत गंभीर असल्याचेही आ.जयंत पाटील म्हणाले.
इमारत धोकादायक झाली असल्याने ती पाडून नवीन इमारत बांधण्याची सूचना आरोग्य विभागाने बांधकाम विभागाला केली असून त्यापूर्वी महामंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेने इमारतीची तपासणी करून इमारत पाडून नव्याने बांधकाम करणे आवश्यक असल्याचा अहवाल दिला असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर अहवालाकडे दुर्लक्ष केले असल्याची टीकाही त्यांनी केली.
दहा वर्षात इमारतीच्या देखभाल दुरुस्ती आणि सुशोभीकरणावर तब्बल 12 कोटी म्हणून अधिकचा निधी खर्च करण्यात आला आहे या इमारतीचा रॅम्प पडला असून हा रॅम्प बांधण्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे त्याचबरोबर जिल्हा नियोजन विभागामार्फत रुग्णालय परिसरातील बांधकामे अंतर्गत रस्ते आणि इतर सुविधांसाठी ही चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा तसेच रायगड जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नव्याने इमारत उभी करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.