विकास करण्याची स्थनिकांची मागणी
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील मिरची गल्लीची ओळख गेली 50 वर्षांआधीदेखील मिरची विक्री व्यवसायाच्या नावाने प्रसिद्ध होती व आजही या परिसराला मिरची गल्ली नावानेच पंचक्रोशीत ओळख आहे. पनवेलच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागातून येथे मोठ्या प्रमाणावर मिरचीचा व्यवसाय होत असल्याने मिरची गल्ली हे नाव पडल्याचे बोलले जात आहे.
पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटी, मिरची गल्लीनंतर काही वर्षांपूर्वी वसलेले साई नगर या परिसरात रस्त्याचे काँक्रिटीकरण युद्धपातळीवर होत आहे; परंतु पनवेलची शेकडो वर्षे जुनी मिरची गल्ली ही अनेक वर्षे उपेक्षित का? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. या परिसरातील चंचुमय गटारे, मोडकळीस आलेल्या शंभर वर्षे जुन्या धोकादायक इमारती, महावितरणचे भंगार लाईटचे पोल, त्यावर लटकलेले गंजलेली विद्युत वायरची जाळी आजही शेकडो वर्षे त्याच स्थितीत असल्याने या परिसराला आजही दुर्लक्षित ठेवण्यात आल्याने येथील नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरी या प्रख्यात मिरची गल्ली बाजारपेठचा विकास होईल का व येथील रस्ते मोठे होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल का, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.







