मृत्यूनंतरही सोसाव्या लागतात नरकयातना

वारे ग्रामस्थांची मृत्युची वाट ही बिकट; स्मशानभूमीची शेड मोजतेय अखेरची घटका
। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील वारे गावामधील स्मशानभूमीच्या बकाल अवस्थेमुळे तेथील माणसांची मरणानंतरही सुटका होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षे स्मशानभूमी शेडची दुरुस्ती न केल्याने शेड अखेरची घटका मोजत आहे.

मृत्यू कुणालाही चुकत नाही. हे शास्वत सत्य असून जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्वात शेवटचा सोपस्कर म्हणजे अंत्यसंस्कार. मनुष्याचा शेवट चांगला व्हावा अशीच धारणा प्रत्येकाची असते. तर मृत्यूमुखी पडलेल्या इसमावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावा, यासाठी जवळच्या नातेवाईकांची धडपड असते. मात्र, वारेमधील स्मशानभूमीच्या बकाल अवस्थेमुळे मृत्यूनंतरही यातना साथ सोडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामस्थ गावाशेजारी असलेल्या तलावाच्या बाजूला खासगी जागेत अंत्यविधी करीत होते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच स्व. प्रवीण म्हसे यांच्या प्रयत्नाने तलावाशेजारीच पक्की स्मशानभूमी बांधण्यात आली. मात्र अनेक वर्षे त्या स्मशानभूमी शेडची योग्य देखभाल तसेच दुरुस्ती वेळोवेळी करण्यात आली नाही. प्रेताच्या अग्नींमुळे शेडवरील पत्रे जळाले आहेत तर लाकडे रचून ठेवण्याच्या जागेची देखील दुरवस्था झाली आहे. परिणामी, पावसाळ्यात अंत्यसंस्काराचे विधी करताना ग्रामस्थांना प्रचंड हाला सहन करावा लागत आहे. याशिवाय पावसापासून बचाव करण्यासाठी प्रेतावर ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.

मृतदेहाची विटंबना
पावसाळ्यात शेड अभावी लाकडे ओली होतात. परिणामी, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहिल्याने मृतदेहाची विटंबना होते. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने स्मशानभूमीची योग्य देखभाल, दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वारे गावासाठी बांधण्यात आलेली स्मशानभूमी शेडची ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी दुरुस्ती केली आहे. आगीमुळे छताचे पत्रे निकामी होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पूर्णपणे आरसीसी बांधकाम असलेली चांगल्या दर्जाची स्मशानभूमी बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील.

– योगेश राणे, सरपंच, वारे ग्रामपंचायत
Exit mobile version