स्मशानभूमीत छत्र्या पकडून अंत्यसंस्कार; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
| नेरळ | वार्ताहर |
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.. सुरेश भटांच्या या गझलमध्ये जरी मृत्यूनंतर सुटका होत असली, तरी कर्जत तालुक्यातील वावलोली ग्रामपंचायत हद्दीतील कुंडलजमध्ये मात्र मृत्यूनंतरही यातनेतून सुटका नाही, असेच विदारक चित्र पहायला मिळते.
धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसात प्लास्टिकचा किंवा छत्रीचा आडोसा करून मृतदेह सरणावर ठेवावा लागतो. स्मशानभूमीत शेड आणि अन्य सुविधांअभावी अंत्यविधीसाठी होणारी परवड पाहता मृत्यूनंतरही सुटका नाही, असेच म्हणावे लागेल. कुंडलज गावातील स्मशानभूमीच्या दाहिनीच्या शेडवर पत्रे नसल्याने भरपावसात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. परंतु, याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कर्जतपासून सुमारे 4 कि.मी. अंतरावर वावळोली ग्रामपंचायत हद्दीत कुंडलज गाव आहे. कुंडलज गावाबाहेर कर्जत-मुरबाड राज्यमार्गवर गावापासून दीड कि.मी. अंतरावर पारंपरिक पद्धतीची स्मशानभूमी उभारली आहे. परंतु स्मशानभूमीवरील पत्र्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, काही पत्रे उडाले आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना भरपावसात अंत्यसंस्कार करावे लागतात. शुक्रवार, दि.28 रोजी कुंडलज गावातील हरिश्चंद्र भगत यांचे निधन झाले होते. परंतु त्यावेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्न मृतांच्या नातेवाईकांना पडला होता. पाऊसही कमी होत नव्हता. त्यामुळे स्मशानात मृतदेह ठेवून वर छत्र्यांचा आधार घेत लाकडे ठेवावी लागली, तर अनेक नातेवाईकांना छत्र्या घेऊन अंत्यसंस्कार करावे लागले, यासारखी मोठी दुर्दैवी गोष्ट नाही. अशी प्रेताची अहवेलना किती दिवस करायची, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
सोळा संस्कारांपैकी हा महत्त्वाचा अंत्यसंस्कार भरपावसात पार पाडताना प्रेताची विटंबना होऊ नये यासाठी या स्मशानभूमीच्या दाहिनीवर लवकरात लवकर पत्रे टाकण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत असून, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींनीदेखील ग्रामीण भागातील अशा समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.