हृदय, किडनी आणि डोळे केले दान
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मरावे परी अवयव रुपी उरावे ही उक्ती पोलीस उपनिरीक्षक गणपत अंबाजी पिंगळे (57) यांनी मरणोत्तर अवयवदान करून सार्थ करून दाखवली आहे. आपल्या सेवा काळातसुद्धा त्यांनी अनेक सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, रायगड जिल्ह्यातील ठाकूर समाजतील ते पहिले पोलीस उपनिरीक्षक आहेत.
गणपत पिंगळे हे नागोठनेनजीक, रा. पिंपळवाडी, वासगाव, येथे वास्तव्यास होते, तर मुंबई गोवंडी येथे ते पूर्वी कार्यरत होते. आपल्या गावी असताना त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यांना पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. आपले मरणोत्तर अवयवदान करावे हा संकल्प गणपत पिंगळे यांनी केला होता. त्यानुसार त्यांची इच्छा असल्याने त्यांच्या कुटुंबियांना लागलीच अवयवदानाचा निर्णय घेतला. गणपत पिंगळे यांचे डोळे, किडनी व हृदय काढून गरजवंतांना पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
पिंगळे हे कष्टकरी ठाकूर समाजातून येऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी झाले होते. त्यामुळे आपल्या समाज बांधवांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात एटीएस कमांडो अधिकारी म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी सुधागड तालुक्यातील शरदवाडी येथील दारूकांडबाबत केलेले काम व मदत उल्लेखनीय होती. धनगर समाज अनुसूचित जमातीत सामावून न घेण्यासाठी शासन दरबारी केलेला विरोध महत्त्वाचा आहे. यासाठी त्यांनी अवघ्या आठवडाभरात 45 हजार लोकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. समाजातील तरुणांना सरकारी नोकरी, उद्योगधंदे, योजना व प्रबोधन याबाबत मार्गदर्शन करणे, सल्ला देणे हे काम ते नेहमीच कारायचे.
नागोठणे जिल्हा परिषद गटातून सदस्यासाठी निवडणूक लढवली, पण थोडक्यात पराभव झाला. मात्र, तरीही हा सामाजिक कार्यकर्ता कधीच मागे हटला नाही. अलिबाग येथे कार्यरत असताना जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद किंवा कोणत्याही सरकारी कामासाठी समाजबांधव आल्यास त्यांच्या कामात मदत करण्यासाठी किंवा त्यांचे काम सोपे करण्यासाठी गणपत पिंगळे धावून येत होते. रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची राहण्या-खाण्याची व्यवस्थासुद्धा करत होते.
रुग्णालयाने दिली मानवंदना
एमजीएम रुग्णालयाच्या स्थापनेपासूनची अशा प्रकारे विविध अवयवदान करण्याची ही दुसरी घटना आहे. यावेळी रुग्णालयाने गणपत पिंगळे यांना मानवंदना दिली. यावेळी रुग्णालयाचे डीन, व्यवस्थापक यांच्यासह सर्व पदाधिकारी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.