बस स्थानकाचे नूतनीकरण गुलदस्त्यातच

भूमिपूजन होऊन पाच वर्षे उलटूनही कामाच्या गतीचा अभाव

| रायगड | प्रमोद जाधव |

जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या अलिबागमधील जून्या एसटी बस स्थानकाच्या जागी नवीन स्थानक उभारणीसाठी पाच वर्षापूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु, या बस स्थानकाचे नुतनीकरण गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नव्या एसटी बस स्थानकाचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा सवाल जनमानसातून उमटत आहे.

अलिबाग एसटी बस स्थानक 40 वर्षांहून अधिक जूने आहे. प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जीर्ण झालेल्या अलिबाग बस स्थानकाच्या जागी नवीन एसटी बस स्थानक बांधण्याचा निर्णय त्यावेळी सरकारने घेतला होता. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत 28 ऑगस्ट 2018 रोजी मोठ्या थाटामाटात नवीन स्थानकाच्या कामाचे भूमीपूजन झाले होते. कामाची हालचालही सुरु झाली होती. तसेच, अलिबाग स्थानकातील मातीचे परीक्षण 2019 मध्ये पुणे येथील डिरोक्ट्रीक इंजिनिअरिंग या कंपनीकडून करून नुतन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी 6 कोटी 28 लाख रुपये खर्च अपेक्षीत होतेे. तसेच, 7 हजार 630 चैारस फुट इतक्या क्षेत्रावर नवीन स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार होते. तळ मजला व पहिला मजला अशा पद्धतीने बस स्थानकामध्ये इमारत होणार होती. स्थानकातील तळ मजल्यामध्ये 14 फलाटांचे नियोजन होते. त्यात प्रवाशांसाठी खास प्रतिक्षालय, उपहारगृह, प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक प्रमुख कार्यालय असणार होते. त्याचबरोबर पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात येणार होतेे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगळे कक्ष असणार होते. सुमारे 1 लाख प्रवासी ये-जा करण्याची क्षमता नव्या स्थानकात होती. त्यामुळे 18 महिन्यांत म्हणजेच 21 सप्टेंबर 2021 पर्यंत स्थानकाचे काम पुर्ण होणे गरजेचे होते. परंतु, पाच वर्षे होऊनदेखील या स्थानकात साधी वीटही रचण्यात आली नाही. ज्या जागेत स्थानक बांधणार होते त्या जागेवर सीएनजी पंप उभारण्यात आला आहे. त्यामुळे अलिबागकरांचे नव्या स्थानकाचे स्वप्न आता स्वप्नच राहणार की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आगाराच्या दूरावस्थेबाबत दुर्लक्ष
नोकरी व्यवसायाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणून अलिबागला येणाऱ्यांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. एसटी बसने दिवसाला प्रवास करणाऱ्यांची संख्या 20 हजार पेक्षा अधिक आहे. सुमारे 19 हजार किलो मीटर अंतर एवढी एसटी बस धावते. ग्रामीण भागासह जिल्ह्याबाहेरदेखील एसटी बस प्रवाशांना सुरक्षीत घेऊन जाते. त्यामुळे प्रवाशांसह पर्यटकांना वाहतूकीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अलिबाग आगारातून प्रयत्न केला जात आहे. मात्र, याच अलिबाग आगाराची अवस्था दयनीय झाली आहे. सतत स्लॅब कोसळणे, कार्यालयात पाणी शिरणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नियोजित बसस्थानकाचा तपशील
जागेचे एकूण क्षेत्रफळ-
19 हजार 530 चैा.मी.
आगाराचे क्षेत्रफळ- 11 हजार चैा.मी.
बस स्थानकाचे क्षेत्रफळ- 7 हजार 630 चैा.फुट
आगार निवासस्थानाचे क्षेत्रफळ- 900 चैा.फुट
सर्वे नंबर- 778, 1298
वास्तूविशारद- गोडबोले मुकादम ॲन्ड असोसिएट्स
Exit mobile version