…अन्यथा आत्मदहन करणार; ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
| धाटाव | प्रतिनिधी |
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष उलटली तरी रोहा तालुक्यातील करंजवाडी या गावात रहदारीसाठी पक्का रस्ता नाही. ग्रामस्थांची पायपीट ही दगड धोंडे आणि चिखलमय रस्त्यातून होत असल्याने अतोनात हाल होत आहेत. या गंभीर बाबीकडे शासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
रस्त्याच्या समस्येसाठी आणि ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आता आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थ आणि महिलांच्या मोर्चाद्वारे शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून आपले गाऱ्हाणे त्मांडून ग्रामस्थांनी आमत्मदहनाचा इशारा दिला आहे.
धोंडखार ग्रामपंचायत हद्दीतील करंजवाडी येथे धनगर समाजाची लोक वस्ती आहे. गेले कित्येक वर्षे या वस्तीला रहदारीसाठी रस्ताच नाही. ग्रामस्थांनी अनेक राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवले; परंतु कोणीही दखल घेतली नाही. या वस्तीवरील कोण व्यक्ती आजारी पडला, एखाद्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जायचे असेल तर डोली करून न्यावे लागते, अशी भयावह अवस्था ग्रामस्थांची आहे. शिक्षणासाठी सुद्धा या रस्त्यावरून ये-जा करीत असताना कसरत करावी लागते. त्यामुळे बऱ्याचदा शैक्षिणक नुकसानालाही सामोरे जावे लागत आहे. शेतकरी वर्गालाही मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी शरद पवार गट पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष तुषार खरीवले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे व्यथा मांडली. यावेळी तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेत तुषार खरिवले यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रोह्यात बोलावून ग्रामस्थांतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुरवड यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रोह्यातील लोकप्रतिनिधी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दगड धोंडे आणि चिखलमय रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आम्ही गावातील 50 कुटुंबे आत्मदहन करू. शासनाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही सर्वजण चिता रचून पेटवून घेऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गेली कित्येक वर्षाच्या रस्त्याच्या समस्येमुळे आम्ही मुंबईला राहतो. गावाला आल्यावर रस्त्याची अवस्था ही कायम बिकट झालेली दिसते. यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले; पण अद्याप रस्ता झालेला नाही.आम्हाला पहिला रस्ता द्या हीच आमची मुख्य मागणी आहे.
महिला ग्रामस्थ
(करंजवाडी /रोहा)
करंजवाडी गाव आणि त्या ठिकाणच्या महिला आणि बालक हे शिक्षणापासून, आरोग्यापासून वंचित आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. साधारण 2.5 ते 3 किलोमीटरच्या रस्त्यासाठी ग्रामस्थ उपेक्षितच आहेत. आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत.मुख्यमंत्री महोदयांना लवकरच भेटून लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त करणार आहोत.
रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष
(राष्ट्रवादी शरद पवार गट)






