कोव्हिडवर मात करूनही महिनाभरापासून रुग्णालयातच!

। पनवेल । वार्ताहर ।
कोरोना बरा झाल्यानंतरही इतर व्याधींनी ग्रासल्याने अनेक रुग्णांना रुग्णालयातच रहावे लागत आहे.पालिकेकडे अशा रुग्णांची वेगळी नोंद नसली तरी अशाप्रकारचे रुग्ण सध्याच्या घडीला खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांच्या संख्येचा आकडा 61 हजार 799 पर्यंत पोहचला आहे. यापैकी 59 हजार 558 रुग्ण कोविडने पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला 979 सक्रिय पालिका क्षेत्रात आहेत. यापैकी बहुतांशी रूग्ण घरीच उपचार घेत आहेत तर अद्यापही शेकडो रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र कोव्हिडमधुन मुक्तता झाल्यानंतरही इतर आजार जडल्याने बहुतांशी रुग्णांना रुग्णालयात थांबुन उपचार घ्यावे लागत आहे.पनवेल महानगरपालिकेकडे अशाप्रकारची आकडेवारी उपलब्ध नसली तरी असे रुग्ण आजही मोठ्या संख्येत आहेत.

कोरोनाचे एकूण रुग्ण – 61799
बरे झालेले रुग्ण – 59558
सध्या उपचार घेतलेले रुग्ण -979
एकूण बळी – 1262

पोस्ट कोव्हिडचा धोका
पोस्ट कोव्हिड रूग्णांमध्ये हृदयाशी संबंधित अडचणींमध्ये तीव्र वाढ झाल्याचे दिसून येते. 50 वर्षांवरील वयोगटामध्ये श्‍वासोच्छवासाची समस्या, छातीत दुखणे, अचानक धडधडणे, (एरिथिमियस, विकृती) यासह दीर्घकालीन ह्रदयाचा त्रास होतो. हृदयाचा ठोका, जळजळ होण्याचे प्रमाण वाढणे आणि पोस्ट कोव्हिड कालावधीत हृदयविकाराचा झटका, हृदयाची पंपिंग क्षमता कमी अधिक होणे आदी समस्या दिसून येतात. हृदयविकाराच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन गुतांगूत आणखी वाढू शकते.

कोरोनातुन बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना श्‍वसनाचा त्रास, प्रचंड डोकेदुखी आदींचा त्रास होत असल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोनातुन बरे झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे घालुन दिली आहेत. यामध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर, क्षारीरिक अंतर पाळणे, आवश्यकतेनुसार गरम पाणी प्यावे, योगासने प्राणायाम करावीत, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधांचे सेवन करावे, सिगारेट, दारू आदी व्यसनांपासून लांब राहावे, पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी.

कोरोनातुन मुक्तता झाली तरी इतर आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वे यांचे पालन करावे. पोस्ट कोव्हिडनंतर आरोग्याशी संबंधित त्रास जाणवल्यास पालिकेच्या प्राथमिक नागरी केंद्राशी संपर्क साधावा.अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .

डॉ आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी
Exit mobile version